नागपूर ः नागपूर शहरातील सिटी सर्व्हेच्या कामामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महिनोंमहिने प्रश्न सुटत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त होतात आणि अधिकाऱ्यांना दोष देतात. मात्र, यातून समाधान काढण्यासाठी नगरभूमापन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या पुढाकाराने शहरात समाधान शिबिर घेण्यात आले. यात अनेकांच्या समस्या निकाली काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नगरभूमापन कार्यालयात चकरा मारूनही आमचे काम होत नाही. दलाल अडवतो’, अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येतात. नागरिकांना माराव्या लागणाऱ्या हेलपाटा आणि त्यांना होत असलेला मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे भूमापन कार्यालयातील भूमापक अधिकारी गौरव रोकडे यांनी सांगितले. सुयोग नगर येथील शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात ४५२ जणांनी अर्ज सादर केले.
१८ सप्टेंबरपासून समाधान शिबिराला सुरुवात झाली. बाबुलखेडा येथील रखडलेली प्रकरणे मार्गी लागावीत, यासाठी साकेतनगर येथील धनोजे कुणबी सभागृहात दोन दिवस शिबिर घेण्यात आले. नगर भूमापन अधिकारी (क्रमांक २) सोनल काळे, मुख्यालय सहायक प्रवीण प्रयागी, परिरक्षक भूमापक गौरव रोकडे आदी अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले. येत्या १५ दिवसांत या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार आहे. नियमात बसणारे अर्ज मान्य करण्यात येतील. काही त्रुट्या असल्यास त्या दूर करण्यास सांगितले जाईल. मात्र नियमानुसार मान्य होऊ न शकणारे अर्ज रद्द करण्यात येतील, असे सिटी सर्व्हे कार्यालयाकडून सांगण्यात आले. १२ ऑक्टोबरपर्यंत दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील वेगवेगळ्या मौज्यांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी गौरव रोकडे, भूषण रेशम, महेश मोखारे, राजेश होले, अजय धात्रक, अनंत गुल्हाने. विभाष गोंडाणे. प्रदीप शेगावकर,इर्शाद सय्यद, विजय दारोकर, देवेन्द्र बाचलकर यांनी सहकार्य केले.