
नागपूर : वनपाल ते वनक्षेत्रपाल पदोन्नतीची मागणी अनेक महिने प्रलंबित राहिल्यानंतर अखेर आदेश निर्गमित करण्यात आले. कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटनेने वनभवनासमोर छेडलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) मा. ऋषिकेश रंजन भावसे यांनी पदोन्नतीचे आदेश काढले.
पदोन्नती समितीची प्रक्रिया पूर्ण होऊनही गेल्या आठ महिन्यांपासून आदेश निघाले नव्हते. परिणामी पात्र कर्मचारी पदोन्नतीस मुकत होते. काही जण सेवानिवृत्तही झाले. संघटनेने वारंवार शासनाचे लक्ष वेधले, निवेदने दिली; परंतु दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. अखेर संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
शुक्रवारी झालेल्या धरणे आंदोलनात शेकडो पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. संघटनेचे सरचिटणीस प्रभाकर सोनडवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात “पदोन्नती हा आमचा संविधानिक हक्क आहे” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शासनाने तातडीने आदेश काढले नाहीत, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. संघटनेचे सरचिटणीस प्रभाकर सोनडवले यांच्यासह नरेंद्र धनविजय, अनंता राखुंडे, नामदेव बनसोड, आशिष चक्रवर्ती, संतोष औतकर, सचिन रामटेके, भिमानंद चिकाटे आदी पदाधिकारी शिष्टमंडळात सहभागी झाले होते. त्यांनी पदोन्नतीसंदर्भात आपली भूमिका ठामपणे मांडली. आंदोलनाचे पडसाद प्रशासनापर्यंत पोहोचले. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन भावसे यांनी प्रकरणाची दखल घेऊन तातडीने पदोन्नती आदेश निर्गमित केले. या निर्णयामुळे खेर वनक्षेत्रपाल पदावर पदोन्नतीची प्रतीक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदेश जाहीर झाल्यानंतर आंदोलनस्थळी आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत संघटनेच्या संघर्षाचे कौतुक केले. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कास्ट्राईब संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे वनविभागातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या संघर्षामुळे भविष्यातील पदोन्नती प्रक्रिया वेळेत पार पाडण्याचा दबाव प्रशासनावर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

