



नागपूर ः औरंगाबाद येथे आयोजित महिला सरपंच परिषदेत एका आमदाराने ग्रामसेवकांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आंदोलन करून निषेध करण्यात आला. तसेच शासनाला निवेदन देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुभाष धारपुरे आणि सरचिटणीस हरिभाऊ लोहे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद येथे सोमवारी महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार क्षीरसाट यांनी ग्रामसेवकांना अभद्र भाषेत बोलून त्यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला होता. आमदारांच्या या वक्तव्यावर ग्रामसेवक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यातील ग्रामसेवक असा अपमान सहन करणार नाही. आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन(डीएनई-१३६)ने आंदोलन केले. एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये राज्यातील ग्रामसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष धारपुरे, सरचिटणीस हरिभाऊ लोहे, कोषाध्यक्ष किशोर अलोणे, विष्णूपंत पोटभरे,सुनील जोशी, सचिन खोडे आणि युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.