गडचिरोली : “जितेंगे हम” या प्रकारच्या विविध लघूपटांमधून जिल्हयात चांगल्या प्रकारे जनजागृती होत असल्याचे समोर येत आहे. आदिवासी भागात बरेच चुकिचे गैरसमज कोरोना उपचार व कोरोना लसीकरण प्रक्रियेत अढथळे निर्माण करत आहेत त्यावर या माध्यमातून आळा घालता येईल.
कोरोना तपासणी व त्वरित उपचार व्हावा या करीता जनजागृतीपर “जितेंगे हम” या हिंदी लघुपटाची निर्मिती गडचिरोलीमधील युवकांनी केली आहे. या लघुपटाचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी सदर लघुपट हा कोरोना तपासणी व त्वरित निदान व उपचार व्हावा या करीता सम्पूर्ण जिल्ह्यात दाखविण्यात येणार असल्याचे सांगितले.
या वेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, लघुपटाचे लेखक /दिग्दर्शक प्रकाश लोमेश लाडे, निर्माते तथा जेष्ठ कलावन्त सुनील चडगुलवार सहाययक दिग्दर्शक जितेंद्र उपाध्याय, श्री भगवान गेडाम तसेच लघुपटातील कलावन्त विवेक मून उपस्थित होते. तसेच सदर लघुपटात कलावन्त म्हणून सुनील चडगुलवार, जितेंद्र उपाध्याय, विवेक मून, प्रकाश लाडे, भगवान गेडाम, शरद उंदीरवाडे व रितिक लाडे यांनी अभिनय केला आहे. छायाचित्रण सोनल ढोलने यांनी पार पाडले. सदर लघुपटाचे चित्रीकरण गडचिरोली जवळील पारडी व गोगाव, अडपल्ली या गावी करण्यात आले. या पूर्वी सुद्धा मागील वर्षी याच टीम तर्फे कोरोना प्रसार थांबविण्या करीता “मास्क ” या लघुपटाचे प्रकाशन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले होते. जिल्हयातील कोरोना बाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी युवकांचा चांगला सहभाग दिसून येत आहे.