मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात गेल्यावर्षीच्या अग्निकांडामुळे १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासून अद्यापही येथे अग्निशमन यंत्र लागले नसून हे सरकारचे अक्षम्य अपयश आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आरोग्य यंत्रणेत सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
करोनासह धानाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले असता ते माध्यमांशी बोलत होते. भंडारा जिल्हातील प्रभारी शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली. त्यात भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्र लागण्याबाबत निविदा निघाल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्या निघाल्या काय, हे माहीत नाही. तातडीने ही यंत्रणा लावण्याची गरज आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी बालरोग विभागात अतिदक्षता विभाग तयार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी धान खरेदीही महत्त्वाची आहे. त्यांना अद्याप बोनस मिळाले नाहीत. खरेदी केंद्र बंद आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहे. करोनाबाबत सुरवातीला भंडाराची स्थिती खराब होती. आता स्थिती थोडी सुधारली आहे. परंतु तिसऱ्या लाटेची तयारीही आवश्यक आहे. येथे म्युकरमायकोसिस आजाराबाबत लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्य़ात म्युकरमायकोसिसचे काही रुग्ण आहेत. पण या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूरला पाठवले जाते. मी अधिकाऱ्यांना म्युकरमायकोसिस आजाराचे लवकर निदान व्हावे म्हणून स्क्रिनिंगचा उपक्रम राबवण्याची सूचान केली. ते केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, असेही फडणवीस यांनी सांगितले.
पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची भूमिका दुटप्पी आहे. या सरकारचा सामाजिक न्याय हा बोलण्यासाठी वेगळा व कृतीसाठी वेगळा आहे. या सरकारमध्ये एकाने असे बोलावे व दुसऱ्याने असे बोलावे हे ठरवून केले जाते, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.