नागपूरः समाजकल्याण समितीची मंजुरी मिळाल्यानंतरही वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात आल्या नाही. समाजकल्याण सभापतीकडून आलेली योजनांची फाईल गेल्या २० दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्याकडे पडून आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मिळाला नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. यात समाजकल्याण, महिला, बाल कल्याण विभाग व शिक्षण विभागाकडून सायकली दिल्या जातात. तर समाज कल्याण विभागाकडून ७९ शेवई मशीन, २० एअर कॉम्प्रेसर, बॅन्ड संच, १५२ एच.डी.पी. पाईप, मंडप डेकोरेशन, मोटर पंप, ऑईल इंजिन, १३४ शिलाई मशीन, ७९ ताडपत्री, १५ स्प्रे पंप, २४४ सायकली देण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना आहे. या विभागाकडून झेरॉक्स मशीनसुद्धा वाटप करण्यात येते. अपंग व्यक्तीला याचा लाभ देण्यात येते. ५० ते ६० हजारांना ही मशीन मिळते. समितीच्या बैठकीत गेल्या वर्षातील २०२०-२१ च्या निधीतून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला. परंतु, फायलीचा शोध घेतला असता ती अध्यक्षांकडेच असल्याची माहिती मिळाली. याबाबत सभापतींना विचारणा केली. त्याही हतबल असून सभापतींच्या निष्क्रियतेमुळेच हा प्रकार घडत आहे. इतर विभागात मात्र सर्व सुरळीत सुरू असल्याचा आरोप समिती सदस्य सुभाष गुजरकर यांनी केला.
योजनेची फाइल अध्यक्षांकडे २० दिवसांपासून पडून आहे. अध्यक्षांना शंका असल्यास सभापतींनी त्याचे निरासरन करणे गरजचे आहे. फाइल अडवून ठेवण्याचे मागचे कारण काय? अर्थकारण तर नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. सभापतींचेही विभागावर लक्ष नाही.
व्यंकटेश कारेमोरे, उपगट नेते, भाजप