Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्याभारतमहाराष्ट्रविदर्भसंपादकीय

निर्ढावलेल्या विकृतीला आवरा?

सवयीप्रमाणे हातात वृतपत्र घेत सहज नजर फिरवली.मनाला धक्काच बसला. मन सैरभैर झाले. बातमी होती अंकिता सतीश बाईलबोडे या तेवीस वर्षाची तरुणीची. पुन्हा एकतर्फी प्रेमप्रकरणातून बळी गेला. मग पुन्हा एकदा हिंगणघाट येथील अंकिता पिसुंडे या तरुणीची जळीत काडांतून झालेली हत्या मनात डोकावू लागली . समाजात इतक्या निष्ठुरतेने, निर्दयतेने निरागस मुलींचा नाहक जीव जावा हे फार वेदनादायी. बेसावधपणे एखाद्या सावजाची शिकार व्हावी आणि काही कळण्याआधीची त्याचा जीव जावा तसाच हा प्रकार. होणाऱ्या हल्ल्यातून तिला किती असह्य वेदना झाल्या असाव्यात.अंगाचा होणारा दाह तिने कसा सहन केला असावा? कल्पना करताना मन रक्तबंबाळ झाले. खरंतर या घटना आता नित्यप्राय झाल्या. हे सगळं वाचताना मुलीच्या आईच्या मनात असंख्य वादळे निर्माण व्हावीत, तसे माझेही झाले. नकळत डोळ्याच्या कडा पाणावल्या. मुली बाहेर गेल्यावर घरी परत येईपर्यंत प्रत्येक मुलींचे आईवडील कसे दहशतीमध्ये जगतात हे मी दोन मुलींची आई म्हणून सांगू शकते.

आजपर्यंत कुठलेच कडक कायदे असल्या घृणास्पद कृत्याला पायबंद घालू शकले नाही. देश चंद्रावर संशोधन करायला निघाला. जागतिक पातळीवर आपलं महत्त्व वाढलं असताना स्त्री अस्तित्वाचा कसा चुराडा होतोय हे आपण किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघणार. देशाला कलंकित करणाऱ्या अशा घटना देशाला देशोधडीला नेणाऱ्या नाहीत का? आईवडील मुलींना किती लाडाने मोठं करतात. काळजाचा तुकडा असलेला मुलीचा जेव्हा नाहक जीव जातो.तेव्हा या मरणयातना त्यांना जिवंतपणे सोसाव्या लागतात. या सर्व गोष्टीत त्यांचा काय दोष? आपण जगतोच मुलांसाठी. पण आज तेच सुरक्षित नाही. मग आधुनिकतेचा ढोल का तरी वाजवाचा? आपण सुजाण,निरपेक्ष,निर्भय, सुसंस्कारशाली व सुरक्षित समाज निर्माण करू शकलो नाही,ही खंत मूकपणे स्वीकारावी लागणार आहे.

प्रेम माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देते. पण हेच प्रेम अविवेकीपणे वागायला लागलं तर समाजाची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. प्रेम त्याग, समर्पण, संयम असते. प्रेम कुणाला संपवू शकतं नाही. प्रेमात जीव देणं अपेक्षित असतं जीव घेणं नाही.प्रेमाची परिभाषा अशी विकृती जोपासत नाही.प्रेम जबरदस्तीने मिळवू शकतं नाही. ते अंतरंगातून सहज उमलणार फूल आहे.मग तिथे जोर जबरदस्ती कशी चालणार?

        आजचे वातावरण मुलींकरिता फार दूषित झालेलं आहे. अशा वातावरणात असुरक्षितेच्या सावटाखाली तिने कायम जगावं का?मुक्तपणे ती कधी वावरणार? एक मुलगी म्हणून कायम धास्ती घेऊन जी जगणार कशी? असे एक नव्हे अनेक प्रश्न मनाला अस्वस्थ करतात.आधुनिक नावाच्या वांझोट्या वलयाची झूल घेऊन आपण वावरत असलो तरी जिथे अनेक मुलींच्या आक्ररंदाने आजूबाजूच्या भिंतीही मूक होतात. अशा बेगडी विकासाला महत्त्व तरी काय? जिथे स्त्रीलाच नागवली जाते, पेटवली जाते, त्या देशाचा गौरवही मग भकास वाटायला लागतो.

स्त्री अत्याचाराच्या या कायमरूपी श्रुंखलेमुळे समोर येणारं माणसातील पशुत्व, समाजातील विकृती, निर्लजपणा चव्हाट्यावर येतो . जो माणसातल्या पशुत्वाची ओळख करून देतो. एकीकडे आपण आधुनिक भारताचा कांगावा करतो तर दुसरीकडे मात्र देशातील आया बहिणीही अब्रू वेशीवर टांगली जाते. स्त्रियांसाठी तीच ‘ स्त्रीत्व ‘ शाप ठरणार असेल तर तीने स्त्री जन्म का घ्यावा?कायम असुरक्षिततेच्या वलयात ती का गुदमरावी?कायम घरकोंडीत तिने का जगावं?

असुरक्षितेचा श्रुंखलेतून मुक्त होण्यासाठी तिचा पाठपुरावा करण्यास समाजमन समोर धजणार का… की तिच्या मुक्त संचारावर कायम निर्बंध टाकावे…की पुन्हा लोटावे तिला चार भिंतीच्या आत गुलामगिरीमध्ये जगण्यासाठी….की येतील कुणी पुढे निर्लज्ज विकृतीच्या छाताडावर बसून तिला न्यायदान देण्यासाठी…. तिला अत्याचाराच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी मुळात ही निर्दयी विकृती माणसात आली कोठून याचा शोध घेतला की ही विकृती आजूबाजूची असते. कधी प्रेमात अडकवून तिच्या साध्यापणाचा फायदा प्रियकर उचलतो.अत्याचार करणारेही आजूबाजूचे, नातेसंबंधातीलच असतात. एकतर्फी प्रेमामध्ये तिच्यावर ऍसिड हल्ले करणारेही परिचयातीलच असतात.आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की असले नीच कृत्य केल्यानंतरही आरोपीच्या पाठीमागे उभे राहणारेही जवळचेच असतात. मग असले विकृतीने पछाडलेले विषारी नाग ठेचणार तरी कसे?

एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला केला जातो, जिवंत जाळलं जात.. हे सर्व दृश्य पुन्हा आपण किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघणार… एका घटनेची आग शांत होते ना होते दुसरी घटना पुन्हा आगेत लोटली जाते. आपल्या वासनेसाठी लहान निरागस मुलींना सावज बनून तिला मारणं म्हणजे मर्दुमकी का ?अशा नीच प्रवृत्तींना समाज का पोसतो ? असे कृत्य केल्यानंतरही त्या आरोपीच्या पाठीमागे संपूर्ण त्याचे कुटुंब का उभे राहते ?त्यामुळे ही विकृती निर्ढावली जाते.

निर्भया कांडातील आरोपींना पाच वर्षानंतर फाशी झाली.. त्या आरोपींच्या मागे असणारे वकील, त्यांचे कुटुंब होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. अशा कित्येक गुन्हेगारांच्या पाठीशी कुटुंब उभं राहत … अनेकांना पुराव्या अभावी सोडलं जात.ज्यांच्यावर अत्याचार होतात त्यांना न्यायासाठी वर्षोनुवर्षो न्यायालयाच्या चौकटी झिजवाव्या लागतात….त्यामुळे ही विकृती निर्ढावली जाते. असे कृत्य केल्यानंतरही आपली सुटका होऊ शकते. अशी समज आरोपीला होत असावी म्हणून पुन्हा अनेक गुन्हे त्याच्या हातातून घडत असतात.

 योग्य वेळेत योग्य संस्कार मुलांवर पडायला पाहिजे ते मिळत नाही. माणूसच माणसापासून दुरावत चाललेला आहे. संस्काराची रुजवणूक घरातून, शाळेतून,शेजाऱ्यांकडून आणि कुटुंबाकडून होते ते कुठेतरी मिळेनासे झालेले आहे. संस्कारित पिढी घडवणे आई-वडिलांचे, शिक्षकांचे कर्तव्य आहे. पण आजचा शिक्षक आपल्या कर्तव्याप्रती कितपत प्रामाणिक आहे यावरही प्रश्नचिन्ह उमटतो. आई-वडिलांना मुलांना द्यायला वेळ नाही. संस्कारशील वातावरण कुठेतरी अदृश्य होत आहे.प्रेमाचा वासल्याचा झरा कुठेतरी आटताना दिसतो.माणसातील आपापसांतले जिव्हाळ्याचे संबंध दुरावलेले दिसतात. एकमेकाशी होणारा सुसंवाद दुरावत आहे .तो आधुनिक यंत्रणांच्या बुलडोजरखाली चकणाचूर झालेला दिसतोय . खरंतर ही बाब खूप चिंतनीय आहे. मग संस्कारशील पिढी घडणार कशी? संस्कारशील कर्तव्यदक्ष पिढी घडवायची असेल समाजातून सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत . शिक्षणातून, समाजमाध्यमातून जागृती व्हायला हवी.तरच असल्या विकृतीला आळा बसू शकतो.

तरुणींनी सुद्धा स्वतःला फार जपायला हवं… एकट कुणावरही विश्वास टाकून निर्जन स्थळी जाऊ नये. कुठलाही मुलगा आपल्या आयुष्यात येण्यापूर्वी तो कसा आहे याची पुरेपूर ओळख करून घेणे फार महत्त्वाचे आहे. आज खऱ्या प्रेमापेक्षा वासनारुपी प्रेम जास्त प्रमाणात जागृत झालेला आहे. त्यामुळे समोरचा आपला कशा पद्धतीने फायदा घेतो. याचा अंदाज काही विपरीत घडण्यापूर्वीच व्हायला हवा! म्हणून अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देताना तो किती विश्वासनीयपूर्ण आहे याची शहानिशा करायलाच हवी. जीवन जगत असताना विकृत स्पर्शाला, विकृत नजरेला वेळीच ओळखायला हवे… अन्यथा काही अंशी असल्या कृत्यास स्वतः जबाबदार ठरेल. म्हणून सावत्तेने पाऊल टाकायला हवे!विकृतीचा बहिष्कार हा घराघरांतून व्हायला हवा… मग हे कृत्य करणारे तुमचे जवळचे का असेनात

-प्रा. वैशाली रितेश देशमुख

रा. कुही, नागपूर

9021172362

संबंधित पोस्ट

माजी मंत्री बंग यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद उमेदवारांनी राष्ट्रवादीतर्फे भरले अर्ज

divyanirdhar

भटक्यांना कधी मिळणारा निवारा, सरकारकडेही नाही पैसा…

divyanirdhar

ओबीसींचे आरक्षण कायम ठेवा;कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांच्या नेतृत्वात निवेदन

divyanirdhar

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar

वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांना मिळाली कामाची पावती, पदभरतीस मिळाली मान्यता

divyanirdhar

कसे झाले साध्य; नागपूर जिल्ह्यात १३३ गावांत शंभर टक्के लसीकरण

divyanirdhar