उमरेड : पावसाळा सुरू होताच अशुद्ध पाण्याने जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतो. हे शाश्वत सत्य माहित असतानाही नगर परिषद उमरेडच्या वतीने काही भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. यामुळे कावरापेठच्या नागरिकांनी याविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला. परिणामी तातडीने मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी जलशुद्धीकरण केंद्रास तत्काळ भेट देत नेमकी काय स्थिती आहे, याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत संतोष महाजन, अजय जुनघरे, रुपेश मोंगसे, संदीप कांबळे, मनीष चौधरी, नागेश रहाटे, नितेश जुनघरे, सौरभ दहाघाने, निलेश चौधरी, वैभव दहाघाने, शुभम कुंभरे, भूषण चौधरी, सचिन बाळबुधे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून उमरेडच्या कावरापेठ भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशुद्ध पाणी पिल्यास आम्हाला त्रास होईल, आधीच आम्ही कोरोनामुळे हैराण आहोत. अशा स्थितीत उमरेड नगर परिषदेने पाणी खराब दिल्यास काय करावे, असा सवाल उपस्थित करून कावरापेठच्या नागरिकांनी पाणी पिण्यास नकार दिला होता. लोकांच्या मनातील संतापाचा उद्रेक पाहता याची दखल तातडीने मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी घेतली. त्यांनी सर्वांना आश्वासन देत पुढील दोन चार दिवसात आपल्याला पाणी शुद्ध मिळेल अशी ग्वाही दिली.पावसाळ्यात अशुद्ध पाणी पिल्यास जलजन्य आजार उद्भवतात. परिणामी शेकडोंच्या संख्येने रुग्ण दवाखान्यात जातात. ही सर्व परिस्थिती उमरेड शहरात कोरोना काळात उद्भवू नये म्हणून मुख्याधिकार्यांनी घेतलेली दखल महत्त्वपूर्ण ठरू शकते.