नागपूरः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोक भयंकर दहशतीत आहे. बाळंतीण, गर्भवती महिला, बालकांनाही कोरोनाची भीती सतावतेय. त्याहीपेक्षा आपल्या बाळाला काही होणार तर नाही, या शंकेने पालकांच्या मनात घर केले आहे. मात्र, शहरातील प्रसिद्ध स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख यांनी काळजी न करण्याचा सल्ला दिला. विशेष काळजी घेतल्यास बाळाला कोरोना होत नाही, असे सांगून त्यांनी कोरोनाला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी जिद्दीने लढण्याचे आवाहन केले.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून लोक भीतीच्या सावटात आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना ‘सळो की पळो’ करून सोडले. रुग्णांना बेड मिळत नाही. वेळेत उपचार मिळत नसल्याने एक ना अनेक असे प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतात. हाच प्रश्न बाळंतीण आणि गर्भवती महिलांनाही सतावतोय. त्यांच्याही एक अनामिक भीती निर्माण होते. आपल्या बाळाला तर धोका नाही, या चिंतेत त्या माता असतात. मात्र, काळजी न करण्याचा सल्ला स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख देतात. दूधपित्या बाळाला आईपासून कोरोना होण्याची धोका नाही. मात्र त्याकरिता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. देशमुख ह्या गेल्या २५ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे नागपुरात टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे. तसेच धंतोली येथील गेटवेल हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाच्या त्या प्रमुख आहेत. स्त्री रोगावर त्या महिलांमध्ये जनजागृतीचे काम करतात. त्यांनी विविध विषयांवर २० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्या एनओजीएस संघटनेच्या उपाध्यक्षा आहेत. देशविदेशांत त्या अतिथी प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करतात. कोरोना आल्यापासून त्या महिलांमध्ये विशेष जनजागृती करीत आहेत. कोरोनाच्या काळात बाळंतीण आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचे त्या आवाहन करतात. त्यांनी महिलांसाठी काही टिप्स दिल्या आहेत. याचे पालन केल्यास कोरोनापासून बचाव करता येतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
टिप्स
– नुकत्याच जन्मलेल्या बाळांमध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव खूप जास्त दिसून येत नाही. पण कोविड असलेल्या मातेकडून हा आजार बाळाला सक्रंमित होऊ शकतो. कोविड माता स्तनपान करू शकतात. पण आजाराच्या तीव्रतेवर ते अवलंबून आहे.
-कोरोना आईकडून बाळाला नाळेतून संक्रमित होत नाही. कोरोनाग्रस्त आईच्या दुधातून पण बाळाला संक्रमण होत नाही. पण आईच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाग्रस्त आईच्या बाळाला कोरोना होऊ शकतो.
-गर्भवती स्रियांनी जितके जमेल तेवढे घरातच राहणे व आराम करणे. फक्त १२, १९ आणि ३२ आठवड्यांचीच फेरतपासणी ठेवावी. काही त्रास असेल तर डॉक्टरांशी फोनवर बोलावे किंवा रिपोर्ट वॉटस्अॅपवर पाठवावेत. घरामध्ये, बाहेरील वावर कमी करावा किंवा पूर्णपणे बंद करावा.
-घरामध्ये डोहाळजेवणासारखे छोटेखानी समारंभ करू नये. मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, सॅलड यांचा आहारात मुबलक वापर करावा. प्रोटिन, लोह, कॅल्शिअम असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
-निंबुवर्गीय फळे (संत्री, मोसंबी), आलं, लसूण, हळद, पालक, ब्रोकोली यांचे प्रमाण आहारात जास्त ठेवावे.
-गर्भवतीने स्त्रीरोगतज्ञांच्या संमतीने हलकासा व्यायाम व योगासने मार्गदर्शनाखालीच करावी. विशेषतः श्वसनाचे व्यायाम करावे.