नागपूर ः जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील आंबेडकरी आणि मागासवर्गीयांची मते कॉग्रेसलाच मिळतील, असे भाकीत कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केले. राहुल घरडे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे काम केले. गावागावांत शाखा सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मागासवर्गीयाच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलन केले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी गल्लीपासून मुंबईपर्यंत प्रश्न लावून धरले आहे. त्यामुळे त्याचा समाजात मोठा प्रभाव असून उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यातील ते प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व आहे.
आंबेडकरी समाजासह त्यांनी इतर समाजातील लोकांना जोडण्याचे कार्य केले आहे. कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर तालुक्यात जिल्ह्याचा दौरा करून त्यांनी मागासवर्गीयांच्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. भाजपने आतापर्यंत आंबेडकरी समाजाची दिशाभूल केली आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी ते अधिकच जटिल केल्याचा आरोप राहुल घरडे यांनी केला आहे. कॉंग्रेसपक्ष तळागाळातील आणि गोरगरिबांचा पक्ष आहे. ७०वर्षांमध्ये आनंदी असलेला सर्वसामान्य माणूस गेल्या सात वर्षात दुखी झाला आहे. महागाईने तर कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. युवक रोजगारासाठी दारोदारी भटकत आहे. मात्र, त्याचा रोजगार मिळत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. ऐवढेच नव्हे तर केंद्र सरकारने शेतीपयोगी वस्तूंच्या किमती वाढवून त्यांना आर्थिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही राहुल घरडे म्हणाले.
राजोलामध्ये कॉंग्रेसचाच विजय
राजोला जिल्हा परिषद सर्कलमध्ये कॉंग्रेसचे अरुण हटवार आणि दोन पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील, असाही दावा राहुल घरडे यांनी केला आहे. संपूर्ण आंबेडकरी समाज कॉंग्रेसच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.