प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
नागपूर, ः मेडिकलमध्ये कोट्यावधीची यंत्रसामूग्री आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी अनेकदा यंत्र बंद पडतात. यामुळे ऐन संकटकाळात बुरशीच्या निदानासाठी एमआरआय यंत्राअभावी सीटीस्कॅनचा आधार घ्यावा लागत होता. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार सुरू असतानाच मेडिकलमधील सीटी स्कॅन मागील चार दिवसांपासून बंद पडली आहे.
मेडिकलमध्ये दीड वर्षांपासून एमआरआय बंद असल्याने सीटी स्कॅनवर म्युकरमायकोसिसच्या आजाराचे सुक्ष्म निरीक्षण करण्यात येत होते. मात्र मेडिकलमधील सीटी स्कॅनदेखील बंद पडले. यामुळे कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरणय्त येणारी ट्रॉमा केअर युनिटमधील सीटी स्कॅनवर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे सीटी स्कॅन केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, कोरोना आणि म्युकरमायकोसिस अशा दोन्ही रुग्णांसाठी वेळ निश्चित केल्याने रुग्णांना बरीच प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मेडिकलमध्ये सीटीस्कॅसाठी रुग्णांची गर्दी असते. त्यात कोरोना तसेच बुरशीच्या आजाराची गर्दी असल्याने येथे सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांना दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार एका रुग्णाने केली. वेदना सहन करत सीटी स्कॅन काढण्यासाठी आलेले अनेक रुग्ण येथे प्रतीक्षेत असतात. त्यातच विद्युत प्रवाह खंडीत झाल्यानंतर जनरेटर आहे, मात्र जनरेटरचा उपयोग न करता सीटी स्कॅन यंत्र बंद ठेवण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मेडिकलमध्ये बुरशीच्या आजाराचे १२२ रुग्ण आहेत. त्यांना एमआरआयऐवजी सीटी स्कॅन करण्यात येत आहे. मात्र आता मेडिकलमधील सीटी स्कॅन बंद पडले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ट्रॉमा केअर युनिटमधील संबधित डॉक्टरांना मोबाईलवर फोन केल्यास रॉंग नंबर सांगत फोन कापण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.