



नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे. देशमुख कुटुंबीय घरात आहेत. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापमारी सुरू केली आहे. महिन्याभरा नंतर पुन्हा एकदा ईडीने देशमुखांच्या घरी छापा मारला. अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी देखील झाली होती.
सीबीआयकडून 11 तास चौकशी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.
यापूर्वी सीबीआयकडून 10 ठिकाणी छापे
दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हे आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.