
दिव्य निर्धार ः वृत्तसेवा
नागपूर : शाळांमधील पोषण आहार योजनेवर गॅस सिलिंडर तुटवड्याचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये सध्या केवळ पुढील १५ दिवसांपुरता गॅस सिलिंडर साठा उपलब्ध आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह पोषण आहारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेचा लाभ सध्या सुमारे २ लाख ७८ हजार ७६७ विद्यार्थी घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी दररोज शाळांमध्ये स्वयंपाक करून गरम पोषण आहार देण्यात येतो. २ हजार ७११ शाळांतील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. याकरिता महिला बचत गट, त्याप्रमाणे सेंट्रल किचन यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच काही खासगी महिलांनासुद्धा पोषण आहार बनविण्यासाठी नियुक्त करण्यात आले. त्यांना विद्यार्थ्यांनुसार अनुदान दिले जाते. बचतगट, सेंट्रल किचन आणि इतर महिलांना सिलिंडर गॅसचा पुरवठा करण्यात येतो. खबरदारीचा उपाय म्हणून एक अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासकीय शाळांची पटसंख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कमी होत असून खासगी शाळांकडे ओढा वाढला आहे. विद्यार्थी संख्या वाढावी याकरिता शासनाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणासह पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात २ हजार ७११ शाळांमध्ये पोषण आहार दिला जात असून २ हजार ४७ शाळांमध्ये आहार गॅसवर शिजविला जातो. परंतु, देशभरात सिलेंडरच्या टंचाईमुळे व्यावसायिक सिलिंडर निर्बंध आहे. त्याचा फटका शालेय पोषण आहारावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, विभागालाही याबाबत काहीही सोयरसुतक नसून शाळांमध्ये सद्यःस्थिती काय आहे? याबाबत अनभिज्ञ दिसून आला. परिणामी, शालेय पोषण आहार ‘गॅस’वरच म्हणण्याची वेळ आली आहे.
२ हजार ४७ शाळांमध्ये सिलिंडर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून अधिक सकस आणि पौष्टिक आहार शालेय शिक्षण विभागामार्फत दिला जातो. पूर्वी या शाळांमध्ये चुलीवर पोषण आहार तयार केला जात असल्याने प्रदूषणाचे संकट होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने ‘धुरमुक्त शाळा’ अभियान राबवीत २ हजार ४७ शाळांमध्ये सिलिंडर देण्यात आले. परंतु, पश्चिम आशियातील (इस्रायल-इराण-अमेरिका) युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता कमी झाली असून आयातीवर परिणाम झाला आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, याचे पडसाद शालेय पोषण आहार योजनेवरही उमटत आहेत.
आहारातून अंडापुलावसह खीर बेपत्ता बेपत्ता
गत वर्षी विद्यार्थ्यांना पोषण आहारात अंडी, केळीसह खिचडी व खीर दिली जात होती. शिवाय दर बुधवारी अंडा पुलाव दिला जात होता. तर शाकाहारी विद्यार्थ्यांना केळी किंवा स्थानिक फळ व खिचडीसह खीर दिली जात होती. नव्या शैक्षणिक सत्रात शालेय पोषण आहारात पुलाव, खिचडी, मसाले भातावरच अधिक भर असून विद्यार्थ्यांच्या आहारातून अंडा पुलावसह खीर बेपत्ता झाली आहे.
जिल्हा परिषद प्रशासन आपल्याच तालात
जिल्ह्यातील सुमारे २ लाख ७८ हजार ०६७ विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनावर या टंचाईमुळे टांगती तलवार आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने आहार शिजवणाऱ्या संस्थांना अडचणी येत आहेत. काही शाळांची स्वयंपाकघरे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, विभागाने याबाबत काहीही नियोजन केले नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विभागातील अधिकारी नैना दळवी यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सीईओंना तातडीने पत्र देण्यात येईल, असे सांगितले. मात्र,त्यावरही सिलिंडर
पुरवठा तातडीने होईल काय,हा सुद्धा प्रश्नच आहे. देशभरात सिलिंडर टंचाईचा स्फोट झाला असताना संबंधित विभागात बेफिकीर असल्याचे दिसून येते.

