Divya Nirdhar
Breaking News
औरंगाबादठळक बातम्यानागपूरपुणेमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

‘बार्टी’ : बाबासाहेबांच्या विचार व प्रसाराचे केंद्र

सध्या सरकारी संस्थांचे खासगीकरण सुरू आहे. या संस्थांचे एकदा खासगीकरण झाले की सरकार त्यांच्या जबाबदारीपासून अलिप्त राहते. त्यामुळे कोणत्याही सरकारी संस्थेचे खासगीकरण होऊ आणि ती संस्थासुद्धा बंद होऊ नये, असे धोरण सरकारने राबविणे आवश्यक आहे. राज्यातील सामाजिक न्याय विभागाची स्वतंत्र संस्था असलेली

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच (बार्टी). ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती आणि बौद्धांच्या प्रगतीसाठी कार्य करीत आहे. निधी असताना आणि निधी नसतानासुद्धा योग्यपद्धतीने ही संस्था कार्यरत असून अनुसूचित जातींमधील विकासाला जी गती मिळाली ती बार्टीमुळे.याला कोणीही नाही म्हणणार नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत समाजविरोधी घटक बार्टीची कामे न बघता काही उणिवांचा बाऊ करून तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करीत आहेत. कोणतीही संस्था असो त्यामध्ये काही ना काही उणिवा राहतीलच. मनुष्यसुद्धा परिपूर्ण नाही. ही तर संस्था आहे.शेकडो कर्मचारी काम करतात. हजारो लोक यांच्याशी जुळलेले आहेत. लाखो लोकांचा ही संस्था विकासाचे नियोजन करीत आहे. अनुसूचित जातींमधील लोकांचा विकास काहींना खुपत आहेत. त्यामुळेच ही संस्थेवर आरोप करून तिला बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या नियोजनामुळे गेल्या काही महिन्यात ही संस्था लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना कसा दिला जाईल, यावर स्वतः महासंचालक धम्मज्योती गजभिये जातीने लक्ष देऊन काम करीत आहेत. गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थी आणि लोकांच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे.महासंचालक धम्मज्योती गजभिये हे स्वतः योजनांचा आढावा घेत असून प्रत्येक काम होते किंवा नाही यावर ते गरज ठेऊन आहेत.
बार्टी ही सरकारी संस्था आहे. सरकारच्या निधीवर ती विसंबून आहे. सरकारने जर निधी दिला तर त्यावर योजना कार्यान्वित केल्या जातात. निधी मिळायला कधी उशीर होतो. तर कधी त्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येतात. यातून काही योजनांचा लाभ मिळताना थोडा त्रास होतो. अशा घटनांचा बाऊ काही असामाजिक तत्त्व करीत असून बार्टीत भ्रष्टाचार झाला, असे सांगून काही पत्रकारांना हाताशी धरून बार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संस्था असल्यामुळे काही मानवी चुका होत असल्या तरी संबंधितांवर कारवाई करण्यात येते. मात्र, संस्थाच बंद करा, असा घाट काही समाजविरोधी लोक करीत आहेत. सध्या बार्टी ही उत्तमोत्तम कार्य करीत आहे. तिच्या अनेक योजनांचा लाभ घेणे सध्या सुरू आहे. लोकांपर्यंत पोहोचून योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असताना बार्टीला बदनाम करण्यात येत आहे. याविरोधात समाजातील लोकांनी विरोध करून संबंधितांना जाब विचारणे सुरू केले पाहिजे. अन्यथा बदनाम करून लोकांच्या विकासाच्या संस्था बंद करून त्यांचा विकास खुंटविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याला आपण पुन्हा बळी पडू. असे होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

बार्टीचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि यासंबंधी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने ‘बार्टी’ची स्थापना २२ डिसेंबर १९७८मध्ये करण्यात आली. राज्य शासनाच्या समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभागाच्या शासन निर्णयानुसार २२ डिसेंबर १९७८मध्ये स्थापना करण्यात आली. संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज १२ मार्च १९७९ ला सुरू करण्यात आले. संस्थेला मुंबई येथे कार्यालयासाठी योग्य जागा न मिळाल्याने संस्थेचा पाहिजे तसा विस्तार होवू शकला नाही. ही बाब तसेच संस्थेचे उद्दिष्ट विचारात घेऊन ही संस्था मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित करून महात्मा गांधी प्रशिक्षण केंद्र या संस्थेशी १६ फेब्रुवारी १९८७ पासून संलग्न करण्यात आली.

२००८ पासून सायत्त्व
डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि दैनंदिन कामात स्वायतत्ता यावी व काम जलद गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३० एप्रिल
२००८ च्या निर्णयानुसार ही संस्था स्वायत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेची नोंदणी प्रक्रिया ही यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या संस्थेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळ स्थापन करून संस्थेचे काम सुरू आहे.

प्रशिक्षणाच्या योजना
या संस्थेमार्फत केंद्र सरकार पुरस्कृत अनुसूचित जातीच्या वंचित घटकांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सुरू केले. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना कौशल्य विकासचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित झालेली आहेत.

जातपडताळणीची जबाबदारी
२९ ऑगस्ट २०१२ अन्वये राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठीही या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या १५ विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची समन्वय साधून समित्यांनी साधलेल्या प्रगतीबाबत कामाचा आढावा घेणे व त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे या कामासाठी ‘मुख्य समन्वयक जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या’ (Chief Co-Ordinator Caste Validity Scrutiny Committee) म्हणून बार्टीच्या महासंचालकांना नियुक्त करण्यात आले आहे.सामाजिक समता या विषयावर सखोल अभ्यास, संशोधन, प्रशिक्षणाचे भरीव कार्य व्हावे यासाठी उद्दिष्टे व कामे निर्धारित केली असून त्यामध्ये खाली नमूद केलेली उद्दिष्टे व कामांचा समावेश आहे.जात पडताळणी विभागातील जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन स्वरूपात जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला देण्यास सुरूवात ऑगस्ट, २०२० साली झाली. पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण
ही संस्था विशेषत: अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी काम करते. या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बार्टी’कडून प्रशिक्षण आणि शिकवणी देऊन त्यांचा शासकीय सेवांमधील टक्का वाढवणे हा संस्थेचा उद्देश. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक, रेल्वे, एलआयसी व यासारख्या इतर संस्थेमधील स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात. ‘यूपीएससी’साठी ३०० विद्यार्थ्यांना दिल्ली येथील नामवंत शिकवणी वर्गांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्याचा संपूर्ण खर्च ‘बार्टी’कडून केला जातो. याशिवाय एमपीएससीच्या जवळपास सहाशे विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत शिकवणी वर्गांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संस्थेची स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत. स्वयंसहाय्यता युवा गट हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत ३ हजार ७०० युवागटांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच याबाबत युवावर्गास रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण (इडीपी) देण्यात आले आहे. युपीएससीच्या प्रशिक्षणाकरिता यशदा येथे ३० विद्यार्थ्यांना, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये ६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत २७६ उमेदवारांना व युपीएससी नागरी सेवा मुलाखतीकरिता आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत २३ उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले आहे.

ॲट्रॉसिटीबद्दल जनजागृती
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अॅट्रॉसिटी कायदा १९८९) या विषयावर कार्यशाळा विभागांतर्गत ऑनलाइन पद्धतीने एकूण २४ कार्यशाळा संपन्न झाल्या. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अॅट्रॉसिटी कायदा १९८९) कार्यशाळा विभागांतर्गत मदतकक्ष प्रस्तावित. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अॅट्रॉसिटी कायदा १९८९) कार्यशाळा विभागांतर्गत अॅट्रॉसिटी कायद्याबाबत धोरणात्मक शिफारशींबाबत परिसंवाद प्रस्तावित आहे.

कामगारांच्या मुलासाठी पब्लिक स्कूल
येरवडा संकुल येथील सफाई कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शाळेचा विस्तार करण्यासाठी दुसऱ्या मजल्याचे काम करण्यात आले व शाळेचे आधुनिकीकरण करून पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने सुसज्ज ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल, सीसीटीव्हीनी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. उल्हासनगर, ठाणे येथील जागेवर बार्टीचे प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह इत्यादी बांधकाम करण्यासाठी बार्टीच्या निधीतून १० टक्के रक्कम २.५ कोटी समाजकल्याण व बार्टी यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आले. येवला मुक्तीभूमीचा परिसर बार्टीकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

पथदर्शी सर्वेक्षण
महाराष्ट्र राज्यातील अनु.जातींच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाबाबतचे बेंचमार्क सर्वेक्षण हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत ०७ विभागनिहाय गावांची निवड करून पथदर्शी सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर सर्वेक्षण करण्यात येणार आहे, Interdisciplinary Research Journal of Dr. Babasaheb Ambedkar Research and training institute Pune या नावाने संशोधन जर्नल हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. Developmentof schedule caste (Issues challenges and way forward) या विषयावर राज्यस्तरीय परिषद आयोजन करण्यात आले आहे. नागपूर (रहाटेनगर) येथील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले. हिंदू खाटीक समाजाचा सुधारित अहवाल शासनास सादर करण्यात आला, पश्चिम महाराष्ट्रातील भटके गोसावी समाजाचा सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास हा अहवाल शासनास सादर करण्यात आला.

विविध योजनांचा लाभ
गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे या योजनेचे मूल्यमापन अहवाल शासनास सादर केला. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य योजना या योजनेचे मूल्यमापन अहवाल शासनास सादर केला. रमाई आवास योजनेचे मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीच्या विद्यार्थी / लाभार्थी संख्येमध्ये प्रतिवर्षी १०७ वरून २०० वाढ करण्यात आली तसेच सन २०१९-२० करिता पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती अदा करण्यात आली. सन २०१९, २०२० व २०२१ करिता पीएच.डी साठी अधिछात्रवृत्ती धारकांचा कालावधी ०३ वरून ०५ वर्ष करण्यात आली.

बार्टी संस्थेची प्रमुख उद्दिष्टे
सामाजिक समता व न्याय या विषयाशी सुसंगत बाबींशी निगडित संशोधनात्मक उपक्रम हाती घेणे,सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे मूल्यमापन करणे,संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी व शैक्षणिक उपक्रमासाठी संमेलने, व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे, संस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असे वाचन साहित्य, संशोधनात्मक अहवाल, निबंध, नियतकालिक व पुस्तके प्रकाशित करणे, संस्थेच्या कामासाठी निधी जमा करण्यासाठी उपक्रम राबविणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविणे, संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे, विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली ‘सामाजिक समता’ याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्त्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल, याबाबत संशोधन करणे, सामाजिक समता याविषयांशी निगडित असे व्यावसायिक ज्ञान व अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुणांना सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशात्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ होईल, असे प्रशिक्षण देणे, समाजातील विविध स्तरांमध्ये ‘सामाजिक समता’ या तत्वप्रणालीवर आधारित सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अधिक संशोधन करणे, त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करण्याबाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून ‘सामाजिक समता’ या कार्यास उचलून धरणे, महाराष्ट्रामध्ये योग्य ठिकाणी ‘सामाजिक समता’ तत्त्व प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शाखांची स्थापना करणे, ‘सामाजिक समता’ या विषयासंबंधी समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्रांची स्थापना करून चालविणे, संस्थेच्या उद्दिष्टांनुसार प्रस्तावित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करून त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे, समाजाच्या पुन:सरण उद्दिष्टानुसार पारितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्यावेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करणे.

इत्यादी चांगली कामे बार्टी करीत असताना त्यावर बिनबुडाचे आरोप करून तिला बदनाम करण्याचे प्रयत्न समाजातील सुज्ञ घटकाने हाणून पाडले पाहिजे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. एक-एक संस्था बंद झाल्या तरी समाजातील लोकांना कोणत्या यंत्रणेकडे योजना सुरू करून दाद मागावी. आतापासून सर्वांना शहाणे होणे आवश्यक आहे. बार्टीसारख्या संस्थेला बळ देण्याची गरज आहे. तिला गावातील प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचविण्याची गरज आहे.

-राजानंद कावळे
शेतकरी व कामगार, नेते नागपूर
मो.९८२२७२९७६६

संबंधित पोस्ट

कृषीमालाचे गुणात्मक उत्पादन गरजेचे : नितीन गडकरी

divyanirdhar

अतिक्रमण हटविताना अडथळा, नगराध्यक्षांसह 13 जणांवर गुन्हे दाखल

divyanirdhar

कसे झाले साध्य; नागपूर जिल्ह्यात १३३ गावांत शंभर टक्के लसीकरण

divyanirdhar

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपुरात आगमन

divyanirdhar

हुकूमचंद आमधरे यांच्या प्रयत्नाने उन्हाळी ज्वारीच्या खरेदीमर्यादेत वाढ

divyanirdhar

सामाजिक न्याय विभागात अनेक अधिकारी ९ वर्षांपासून एकाच विभागात

divyanirdhar