मुंबई ः महाराष्ट्राचं शोषण करणारं हे सरकार असून करोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार असून त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड कऱणार असल्याचा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती प्रहार केला आहे. संजय राऊत, महाविकास आघाडी यांच्या कारभारावर त्यांनी कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत.
या सरकारने करोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे. लसींचं टेंडर का रद्द केलं? राऊतांनी उत्तर द्यावं, असंही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात, मग सरकारनं सरळ केंद्रातच विलीन व्हावं असंही ते म्हणाले. राज्यातल्या करोना परिस्थितीबद्दल ते म्हणतात, करोना संपवणं याच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. उलट करोना या सत्ताधाऱ्यांना लाभदायक आहे. त्यांना यानिमित्ताने पैसे खायला मिळाले.
त्याचबरोबर सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नाही…ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत..काहीच नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. जनाची नाही तर मनाचीही नसलेलं हे सरकार असून ते मुख्यमंत्री पदाच्या लायकीचंच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली आहे.
सामनाच्या अग्रलेखावरुन त्यांनी संजय राऊतांनाही खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणतात, “भुताटकी मातोश्रीवर आहे, मंत्रालयात आहे..तिथे शांतीयज्ञ करुन घ्या.”
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावरुन त्यांनी उदय सामंतांनाही चांगलंच सुनावलं आहे. आपलं पक्षात काय स्थान आहे हे ओळखून गाठीभेटी घ्याव्यात असा सल्लाही राणेंनी दिला आहे. मराठा आरक्षण मिळालं नाही याला संपूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. न्यायालयासमोर मराठा आरक्षणासंदर्भातली जी माहिती द्यायला हवी होती, ती या सरकारने दिलीच नाही असा आरोपही राणे यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा हा नौटंकी दौरा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काहीही दिलं नाही, कोकणच्या विकासासाठी काहीही केलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
previous post