नागपूर: कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी धानाचे बोनस देण्याची मागणी केली आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या शेतातील शासकीय दराने धान्य खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना हमी भावाव्यतिरिक्त अद्याप पर्यंत ७०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बोनसची रक्कम देण्यात यावी अशी मागणी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने केली आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नागपूर जिल्ह्यातील १४४०५ शेतकऱ्यांकडून ५,६९,८०० क्विंटल खरीपातील १८६८ रुपये हमीभाव दराने खरेदी करण्यात आलेला होता. तथापी शेतकऱ्यांचे खरीप हंगाम सुरू होऊनही अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना बोनसची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकीकडे बी-बियाणे व रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, डिझेलचे वाढलेले दर, कोरोना महामारीचे आलेले संकट, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर आलेली दुबार पेरणीची वेळ यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या त्रस्त असून मागील वर्षी उचललेले बँकाचे पिक कर्ज देखील शेतकरी भरु शकत नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बँक पीक कर्ज देण्यास करत असलेल्या टाळा-टाळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. ५,६९,८०० रुपये खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे नागपूर जिल्ह्याला कमीत कमी ४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अख्या जगाला पोसनाऱ्या पोशिंदयालाच त्यांच्या हक्काची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ७०० रुपये प्रति क्विंटल धानाचा बोनस संकटाच्या काळात सरकारने तात्काळ देऊन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी नागपूर जिल्हा (ग्रा) काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे यांनी केलेली आहे.
या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, सहकार मंत्री पाटील, कृषी मंत्री ना. दादा भुसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन पाठवून करण्यात आली. तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीनजी राऊत, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंहारे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन त्यांच्या निर्देशनास हे गंभीर बाब लक्षात आणून दिली. ना. नितीन राऊत यांनी सहकार व पणन मंत्री ना. देशमुख यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची विनंती केलेली आहे. नागपूर जिल्हा (ग्रा.) काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे यांचे नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळात दीपक गजभिये, कृष्णा बोदलखंडे, मनमोहीत घोडेस्वार, अशोक रामटेके, ओमकार मुंडले, नागसेन निकोसे, प्रज्वल तागडे, विनय गजभिये, बुद्धिमान पाटील, लोकेश काटोले, सुनिल बोदलखंडे, घनश्याम हिंघनकर, मुकेश देवगडे आशिष लांबट, सचिन गडे, पंकज राऊत, सुचित मेश्राम यांचा समावेश होता.