नागपूर ः राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काल कामठी येथे घेतलेल्या आढावा बैठकीवरून चांगलेच वादंग माजले आहे. या बैठकीत आपला अपमान केल्याचा आरोप आ. टेकचंद सावरकर यांनी केला असून, त्यांचे आरोप काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी मात्र खोडून काढले आहेत. दोन्ही नेत्यांनी पत्रपरिषदा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
केदार यांनी कामठी तालुक्यातील शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी राज रॉयल लॉन कामठी येथे बैठक घेतली. या बैठकीसाठी आमदार म्हणून मला तहसीलदारांनी निमंत्रित केले होते. परंतु, व्यासपीठावर बसायला जागा दिली नाही. शासकीय बैठकीच्या नावावर हा चक्क काँग्रेसचा मेळावा होता, असा आरोप भाजपाचे आ. टेकचंद सावरकर यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना आ. सावरकर म्हणाले, बैठकीत शिष्टाचारानुसार आमदारांना व्यासपीठावर बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली नाही. काँग्रेस पदाधिकार्यानंतर आठव्या क‘मांकावर आमदारांना बसविण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्यांनाही बसण्यासाठी जागा दिली नाही. तेथे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्तेच बसले होते. सुनील केदार यांना विकास कामांवर बोलण्याची परवानगी मागितली असता, ती त्यांनी नाकारली.
कामठी विधानसभा क्षेत्रातील समस्या मांडण्यासाठी हातात माईक घेण्याचा प्रयत्न केला असता मंत्री महोदय आणि काँग्रेसचे महासचिव सुरेश भोयर व त्यांचे कार्यकर्ते अंगावर धावून आले. मला अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. ही शासकीय बैठक आहे की काँग्रेसचा मेळावा? असा प्रश्न मंत्रिमहोदयांना केला असता त्यांनी त्याचे उत्तरच दिले नाही. यापूर्वीही सुनील केदार यांनी मौदा येथील आढावा बैठकीत माझा अपमान केला आहे. हा माझा एकट्याचा अपमान नसून, मला निवडून देणार्या 5 लाख लोकांचा अपमान आहे. यासंदर्भात त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याची घोषणाही सावरकर यांनी केली.
भोयर काय म्हणाले..
कामठी येथील आढावा बैठकीत आ. टेकचंद सावरकर यांचा कुणीही अपमान केलेला नाही. त्यांनी बैठकीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल भादंवि कलम 353 अतंर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे महासचिव सुरेश भोयर यांनी केली.
आ. टेकचंद सावरकर यांचे आरोप भोयर यांनी खोडून काढले. ही बैठक सरपंच आणि नगरसेवकांसाठी बोलाविली होती. त्यांना बैठकीत बोलू द्या, नंतर तुम्हाला बोलण्याची संधी देतो, असे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. तीनदा आ. सावरकर यांची समजून घातली. तरीही ते बैठकीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत होते. माईक हिसकावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली.
परंतु, कुणीही त्यांना शिविगाळ केली नाही. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, तेव्हा सावरकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. लोकप्रतिनिधींचा आम्ही सन्मान करतो. आ. सावरकर यांनी लावलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत, असेही भोयर यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला जिप अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण सभापती भारती पाटील, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे आदी उपस्थित होते.