नागपूर : राज्यात करोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या एकूण पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४३.०३ टक्केच जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. ६५.४१ टक्केच आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात पुढे आले आहे. याशिवाय राज्यात आजपर्यंत झालेल्या एकूणच लसीकरणापैकी विदर्भात केवळ १९.२७ टक्केच लसीकरण झाले आहे.
राज्यात प्रथम आरोग्य कर्मचारी व त्यानंतर पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर वयाची ६० वर्षे ओलांडलेले, ४५ वर्षावरील सहआजार असलेले, त्यानंतर ४५ वर्षावरील सर्व व आता १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान केंद्राच्या कोविन पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार राज्यात २५ जून २०२१ पर्यंत १२ लाख ६७ हजार ७७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांना पहिली तर ८ लाख २९ हजार ३१४ जणांना दुसरी मात्रा दिली गेली. २० लाख ८४ हजार ३६२ जणांना पहिली तर ८ लाख ९६ हजार ९५० जणांना दुसरी मात्रा दिली गेली. त्यामुळे अद्यापही राज्यात ३४.५८ टक्के आरोग्य कर्मचारी तर ५६.९६ टक्के पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली नसल्याचे स्पष्ट होते.
राज्यात आजपर्यंत सर्वच वर्गात पहिली व दुसरी अशी एकूण ३ कोटी २ लाख ८५ हजार २७ व्यक्तींना लस दिली गेली. त्यातील ५८ लाख ३८ हजार ६३५ जण विदर्भातील आहेत. राज्यातील इतर काही भागाच्या तुलनेत विदर्भात कमी लसीकरण झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यात आजपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ४९ लाख ५७ हजार ६८५ जणांना पहिली तर २ लाख ५७ हजार ४०० जणांना दुसरी मात्रा दिली गेली. त्यात विदर्भातील पहिली मात्रा दिलेल्या ६ लाख ३ हजार ९२३ जण तर दुसरी मात्रा दिलेल्या ६२ हजार २७६ जणांचा समावेश आहे. राज्यात ४५ वर्षावरील १ कोटी ६१ लाख ४७ हजार ५३८ जणांना पहिली तर ३८ लाख ४४ हजार ७ जणांना दुसरी मात्रा दिली गेली. त्यात विदर्भातील पहिली मात्रा दिलेल्या ३३ लाख ६१ हजार ३१० तर दुसरी मात्रा दिलेल्या ८ लाख ४१ हजार ९०२ जणांचा समावेश आहे.
केंद्र सरकारकडून उपलब्ध लसींच्या साठ्यानुसार राज्यात लसीकरण सुरू आहे. झटपट लसीकरणामुळेच राज्याने ३ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. आरोग्य व पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी दुसरी मात्रा उपलब्ध असून त्यांनी स्वत: पुढे येऊन ती घ्यायला हवी.
-दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी, पुणे.