उल्हास मेश्राम ः दिव्य निर्धार प्रतिनिधी
कुही(नागपूर) ः केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोल, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आदेशानुसार, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कुहीसह जिल्ह्यात आंदोलन केले.
केंद्रातील मोदी सरकारवर आगपाखड करताना जिल्हाध्यक्ष राहुल घरडे म्हणाले की, आधीच पेट्रोल- डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या सतत केलेल्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. या परिस्थितीचा सामना करत असताना केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ दरवाढ केल्याने महिला वर्गास सातत्याने तीव्र त्रास भोगावा लागत आहे. अगोदरच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महिला बचत गट, लहान- मोठे उद्योग- व्यवसाय, कारखाने बंद पडल्यामुळे महिला व युवकांमध्ये बेकारी आली आहे.
20 एप्रिल 2020 पासून केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी बंद केल्यामुळे नाइलाजास्तव विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणे अत्यावश्यक झाले आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपये 50 पैशाची दरवाढ करून सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. आजच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीने 850ची मजल मारली आहे. पूर्वीच्या केंद्रामध्ये असलेल्या कॉंग्रेसच्या राजवटीत सर्वसामान्यांना परवडणारा गॅस सिलिंडर 400 रुपयांमध्ये उपलब्ध होत होता व त्याचे दर स्थिर राहावेत म्हणून कॉंग्रेस सरकारचे नियंत्रण होते. याउलट केंद्रातील मोदी सरकारच्या महागाईचा भस्मासुर करून मनमानी कारभारामुळे महिला वर्गामध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरली आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली आहे. त्यात महागाईचा भार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे, असा आरोपही राहुल घरडे यांनी केला. या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी मोदी सरकार गप्पच आहे. त्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी असून गृहिणी मेटाकुटीस आल्या आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरची भाववाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी कुही तालुका कॉंग्रेस, महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली; अन्यथा महिला कॉंग्रेसने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी अनुसूचिती जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे, तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संदीप खानोरकर,सरपंच सुखदेव जिभकाटे,नरेंद्र बारई, तालुकाध्यक्ष उपासराव भुते, मंदा डहारे, सुनीत किंर्देले,सुधीर पिल्लेवान, नागपूर जिल्हा अनूसूजित जाती विभागाचे उपाध्यक्ष विनय गजभिये, नत्थू धोंगडे, किशोर कुर्झेकार,सुशील रामटेके, पुनमचंद वासनिक, राजू कळंबे, परमानंद रामटेके,शैलेश मेश्राम, गोपाल दिघोरे, आनंद वासनिक गौतम शेंडे, अमोल शिंदूरकर, गुड्डू भोयर, मंजू उपासराव भुते,माधुरी किशोर कुर्झेकार,महेंद्र लोखंडे,परमानंद लोखंडे उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी निवेदन देण्यात आले.