



नागपूर : वाघांच्या हल्ल्यात काहीवेळा मानवाला तर कधी त्याच्या पाळीव जनावराला जीव गमवावा लागतो. यातूनच संघर्षाची ठिणगी पेटते, त्या वाघाला ठार करून त्याची कातडी विकण्याइतके हे प्रकरण समोर जाते. अशीच एक कारवाई नागपूर वनविभागाच्या पथकाने केली असून मध्यप्रदेशमधील बिछवासहानी या गावात धाड टाकून या पथकाने वाघाची कातडी आणि पंजे जप्त केले आहे.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आरोपी मोतीलाल केजा सलामे याच्या बैलाला तीन वर्षापूर्वी वाघाने ठार मारले होते. त्याचा बदला म्हणून या वाघावर विषारी द्रव्य टाकत त्याने वाघाला संपविले. मेलेल्या वाघाची योग्यरित्या विल्हेवाट लावत, त्याची कातडी आणि पंजे तीन वर्ष आरोपीने सांभाळून ठेवली. परंतु या अवयवातून काही पैसा मिळावा या उद्देशाने आरोपीने हे अवयव विकण्याचा निर्धार केला. नेहमी हीच बाब नागपूर वनकर्मचाऱ्याच्या कानी आली. त्यानुसार सापळा रचत नागपूर वनकर्मचाऱ्यांनी आरोपीच्या शेतशिवारातील घरीच छापा टाकत मृत वाघाची संपूर्ण कातडी आणि चार पंजे जप्त केले.
आरोपी सलामेच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ कलम २(१६), ९, ३९, ४९. ४३(अ), ५० आणि ५१ नुसार वनगुन्हा नोंदविण़्यात आला आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सावनेर यांनी आरोपीला ३ ऑगस्टपर्यंत वन कोठडी ठोठविण्यात आली आहे. नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एन.जी.चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन.नाईक, एल.व्ही.ठोकळ, एस. बी. मोहोड, फिरत पथक क्रमांक २ व खापा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. प्रकरणाचा पुढील तपास सहा. वनसंरक्षक एस. टी. काळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
अवयवांची किंमत लाखांच्या घरात
वाघाला मारल्यानंतर तब्बल तीन वर्ष आरोपीने त्याचे अवयव सांभाळून ठेवले होते. या अवयाची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी प्रचंड आहे. या अवयवातून चार पैसे मिळावे म्हणून हे साहित्य विकण्याचे आरोपीने ठरविले. याबद्दल वनकर्मचाऱ्यांना समजले, त्यांनी सापळा रचत सावनेर येथे अवयवाची विक्रीचे ठरले. परंतु वेळेवर आरोपीने जागा बदलली, त्यामुळे मध्यप्रदेशात हा व्यवहार ठरला. काही लाखात हा व्यवहार ठरला होता. परंतु प्रत्यक्षात या अवयवाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ५० लाखापर्यंत किंमत असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणात पुढील तपासासाठी वनविभागाचे एक पथक बैतुलला गेले आहे.