नागपूर ः सध्या नऊतपा सुरू असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडू नये, सल्ला दिला आहे. मात्र, नागपूर जिल्हा भूमापन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जास्तच काळजी घेतली आहे. भरउन्हात शेतकऱ्यांच्या बांधावरील मोजणी करू नये, असे न सांगता भरउन्हात काहीही करा, पण मोजणी करा, असा आदेश दिला आहे. याकरिता खिशात कांदा ठेवण्याचाही वैद्यकीय सल्ला या जिल्हा भूमापन अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे कर्मचारी हैराण झाले असून भरउन्हात दुर्गम भागात काम कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
नागपूर जिल्हा भूमापन अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे कर्मचारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांच्या कामाला कंटाळले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर आपली नोकरी या भीतीने कोणीही पुढे यायला तयार नाहीत. याचाच फायदा हा अधिकारी घेत आहे. कर्मचाऱ्यांना त्रास देण्याची एकही संधी हा अधिकारी सोडत नसल्याचे दिसून येते. भरउन्हात कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर मोजणीकरिता पाठवीत आहे. त्यांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना भरउन्हात शेतात मोजणीसाठी उपस्थित राहावे लागत आहे. भूमापन अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या आदेशात हास्यास्पद सल्ला दिल्याचे दिसून येते. हा प्रकार दुधखुळा असून जिल्हा भूमापन अधिकारी कमी आणि वैद्यकीय सल्लागार अधिक असल्याचे दिसून येते. त्यांनी काढलेल्या पत्रकात भूमापकांनी मोजणीला जाताना पिण्याचे पाणी घेऊन जावे आणि भरपूर पाणी प्यावे, तसेच ग्लुकोज पावडर जवळ ठेवावी, मोजणीला जाण्यापूर्वी घरून जेवण करून निघावे व सोबत जेवणाचा डब्बा घ्यावा,
कर्मचाऱ्यांनी बाहेरील पाणी व अन्न खाण्याचे टाळावे, डोक्याला टोपी किंवा पंचा बांधावा तसेच डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून गॉगलचा वापर करावा, कर्मचाऱ्यांनी उन्हापासून त्रास वाचविण्यासाठी सन स्कीन केअर क्रिमचा वापर करावा,मोजणीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत कांदा ठेवावा, उन्हाचा त्रास झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे नमुद केले आहे.
आडमुठेपणा कर्मचाऱ्यांच्या जिवावर
जिल्हा भूमापन अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे अधिकारी चांगलेच हैराण झाले आहे. भरउन्हामध्ये त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर मोजणीकरिता पाठवण्यात येत आहे. यात शिथिलता देण्याची मागणी करून वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. यामुळे भूमापन कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही ः राजानंद कावळे (कामगार नेते)
भरउन्हात कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर मोजणीकरिता पाठविणे हा प्रकार भयानक आहे. यामुळे शेतकरीसुद्धा त्रस्त झाले आहे. यातून जिल्हा भूमापन अधिकाऱ्याला राक्षसी सुख मिळते, असे दिसून येते. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या जिवाचे बरेवाईट झाले तर याविरोधात नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू,असा इशारा शेतकरी व कामगार सुरक्षाच्या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजानंद कावळे यांनी दिला आहे.