हुकूमचंद आमधरे, नागपूर
नागपूर ः गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेस पक्षात दुर्लक्षित असलेल्या जाबांज नेत्याने आता कॉंग्रेसला जीवदान देण्याचा विडा उचलला आहे. सावनेर मतदारसंघातून सतत पाच वेळा निवडून आल्यानंतर आणि कॉंग्रेसला नेत्यांना वाडीत टाकल्यानंतर सुनील केदार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात पुन्हा यश मिळवून दिले आहे. नागपूर जिल्हा परिषद, पदवीधर मतदारसंघ आणि आता बाजार समित्यांमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीण जिल्ह्यात कॉंग्रेस पाया मजबूत करून एक-एक निवडणूक जिंकत आहेत. त्यासोबत पुढील वर्षी होणाऱ्या नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीतही यश संपादन करून कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देतील, अशी आशा सामान्य पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्हा परिषद गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होती. १० ते १५ सदस्यांवर कॉंग्रेस येऊन ठेपली होती. दिवसेंदिवस पडझड सुरूच असल्याने अनेकांनी राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्याच्या भीतीने भाजपला जवळ केले. त्यामुळे कार्यकर्त्यांची पळीच गारद झाली होती. तर नव्याने पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्याची चिंता होती. त्यामुळे पक्षात प्रवेश करतानाही अनेकांना राजकीय नेत्यांना अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात येणारे कमी आणि जाणारे अधिक, अशी स्थिती होती.
दोन वर्षांत केदारांनी पालटविले चित्र
विधान सभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सुनील केदार यांनी नागपूर ग्रामीणमध्ये पक्ष बांधणीला महत्त्व दिले. अनेक युवा कार्यकर्त्यांना सोबत घेतले. खरे विधानसभा निवडणुकीतच त्यांचा प्रभाव जाणवला. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसची फक्त एक जागा आली होती. यावेळी दोन जागा जिंकल्या. सोबतच काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख विजयी झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील पकड त्यांची कायम होती. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. राज्याचे क्रीडामंत्री म्हणून बढती झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, अशी अनेकांना आशा होती. मात्र, त्यांना पालकमंत्री पद मिळाले नाही. ते वर्ध्याचे पालकमंत्री झाले. तरीही त्यांनी नागपूर ग्रामीणमध्ये पक्ष बांधणी सुरू ठेवली. त्याचे परिणाम जिल्हा परिषदेत दिसून आले. सर्वाधिक जागा जिंकणारा आणि सत्ता स्थापन करणारा पक्ष ठरला. त्यामुळे कार्यकर्त्यांत हिंमत आली. अनेकांना त्यांनी ऊर्जा भरली. त्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ५० वर्षांपासून भाजपकडे असलेला मतदारसंघ ताब्यात घेतला. अभिजित वंजारी मताधिक्यांनी विजयी झाले. ही किमया सुनील केदार यांनी केली. आता त्यांचे लक्ष आहे नागपूर महानगर पालिकेवर. त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढल्यास विजय निश्चित आहे असे आता कार्यकर्त्यांना वाटत आहे.
कोण आहेत हे सुनील केदार
सुनील छत्रपाल केदार यांचा जन्म 7 एप्रिल 1961मध्ये नागपूरमध्ये झाला. बीएससी (कृषी), एमबीएपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पत्नी, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. शेती आणि लघू उद्योग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. माजी मंत्री बाबासाहेब ऊर्फ छत्रपाल केदार यांचे ते सुपुत्र. सुनील केदार नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
जिल्हा परिषदेपासून राजकारणास सुरुवात
सुनील केदार यांनी काँग्रेसमधूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. 1992मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. त्यांनी त्याच वर्षी गणेश प्रासादिक शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 4 माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय सुरू केले. त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणावरही अधिक फोकस केला. दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी परिषदांचे आयोजन केले. दुर्गम भागात वीज पुरवठा सुरू व्हावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा आदी प्रश्नांवर त्यांनी लढेही उभारले.
राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री
1995 ते 2014 या काळात 1999चा अपवाद वगळता सुनील केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1999 मध्ये भाजपचे आमदार देवराव आसोले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर भाजपने कधीच या मतदारसंघात विजय मिळवला नाही. 2014 मध्ये संपूर्ण देशात पंतप्रधा नरेंद्र मोदींची लाट होती. त्या लाटेत अनेक दिग्गजांना घरी बसावे लागले. मात्र, केदार यांनी या लाटेतही निसटता का होईना विजय मिळवून सीट राखली होती. 1995 -99, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 पर्यंत त्यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. मार्च 1995 ते जून 1995 ते ऊर्जा आणि परिवहन राज्यमंत्री होते. जून1995 ते 1996 पर्यंत ऊर्जा, बंदर आणि परिवहन राज्यमंत्री होते.
मध्य प्रदेशातील निवडणुकीतही त्यांचा दबदबा
मध्यप्रदेशातील पांढुर्णा, सौंसर, छिंदवाडा या भागात सुनील केदार यांचा दबदबा आहे. मध्यप्रदेशातील विधानसभेत मराठी आमदार ते निवडून देतात. या भागात त्यांचा समाज आणि त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली होती. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहत होते. म्हणजेच नुकतेच भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार यांचे थेट आव्हान होते. मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर करण्यात आली. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे.