



यवतमाळ: शासनाच्या मदतीने वेळोवेळी नवीन चेसीस खरेदी करून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बस बांधणी केली असती तर भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा प्रश्नच उद्भवला नसता, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. मागील काही वर्षापासून एस.टी.चा विस्तार जाणीवपूर्वक रोखला गेल्याचा आरोप संघटनेने केला आहे. जनतेचा एस.टी.वर विश्वास आहे. राज्याच्या विकासामध्ये एस.टी.चा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर गाड्या घेऊन सामान्य जनतेला पुन्हा असुरक्षित खासगी वाहतूकीकडे घेऊन जाणे चुकीचे असल्याचे संघटनेने परिवहन मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्य परिवहन महामंडळ खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतुकीसाठी सुमारे 500 साध्या गाड्या (लालपरी) भाडेतत्त्वावर घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. हा निर्णय महामंडळाला बाधा पोहोचविणारा ठरू शकतो. त्यामुळे मान्यताप्राप्त कामगार संघटनेने याला विरोध दर्शविला आहे. याबाबतचे पत्र परिवहन मंत्र्यांना पाठविले आहे.
महामंडळाच्या सेवेत वाहतुकीसाठी साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा मुद्दा विचाराधीन आहे. खासगी वाहतूकदारांच्या बसेसला नियमित देखभाल, दुरुस्तीसाठी साहित्य ठेवण्याची गरज आहे. यासाठी पुरेशी जागा निश्चित करून त्या जागेचा नकाशा व क्षेत्रफळ याची माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसारित झाल्या आहेत. याशिवाय 300 ते 400 व त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतराच्या चलनात असलेल्या नियताची माहितीही मध्यवर्ती कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. या खासगी गाड्यांचे पार्किंग व मेंटेनन्ससाठी महामंडळाच्या मालकीच्या जागा देणे तसेच जास्त उत्पन्न आणणारे महामंडळाचे मार्गही खासगी वाहतूकदारांना देण्याच्या हालचाली प्रशासकीयस्तरावर सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वी भाडेतत्त्वावरील शिवशाही बसला जास्त उत्पन्नाचे मार्ग देण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता केली जात आहे. महामंडळाने प्रवाशांना वातानुकूलित सेवा देण्यासाठी मोठा गाजावाजा केला. शिवशाही बसेस आणल्या. परंतु त्याचा फायदा महामंडळास न होता खासगी मालकांनाच झाला. शिवशाहीवर प्रशिक्षित चालक नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले. जनतेमधूनही शिवशाही बसला विरोधच झाला. असे असताना पुन्हा भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा तोच प्रयोग करणे चुकीचा आहे. शासनाच्या मदतीने वेळोवेळी नवीन चेसीस खरेदी करून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बस बांधणी केली असती तर भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा प्रश्नच उद्भवला नसता, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. मागील काही वर्षापासून एस.टी.चा विस्तार जाणीवपूर्वक रोखला गेल्याचा आरोप संघटनेने केला आहे. जनतेचा एस.टी.वर विश्वास आहे. राज्याच्या विकासामध्ये एस.टी.चा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर गाड्या घेऊन सामान्य जनतेला पुन्हा असुरक्षित खासगी वाहतूकीकडे घेऊन जाणे चुकीचे असल्याचे संघटनेने परिवहन मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अलीकडील चार ते पाच वर्षात महामंडळात काही खर्चिक असे चुकीचे निर्णय घेतले गेले. या सर्वांमुळे महामंडळाचा आर्थिक तोटा दिवसेंदिवस वाढत गेला आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यावरही होत आहे. एसटीमुळे जनतेला वेळेवर, माफक दरात व सुरक्षित सेवा मिळाली. साध्या खासगी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतल्यास संघटनेचा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल.
-संदीप शिंदे,
अध्यक्ष, मान्यताप्राप्त कामगार संघटना.