वर्धा : कोरोना काळात रुग्णांच्या वाढत्या संख्येला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्सेस यांची कमतरता आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष, नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच पॅथॉलॉजीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची सेवा घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सेवाग्रामच्या कस्तुरबा कोविड समर्पित रुग्णालयाला 400 बेडसाठी अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त 20 के एल द्रव ऑक्सिजन टॅंकरद्वारे पुरवण्यासाठी भिलाई येथील प्रॅक्स एअर लिंडे येथून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त मागणी कळवावी. आतापर्यंत सेवाग्रामसाठी दोन ऑक्सिजन टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक कामासाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलिंडर सद्य:स्थितीत रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सर्व एमआयडीसी मधील उद्योगांना आदेश द्यावेत असेही त्यांनी सांगितले.
सेवाग्राम रुग्णालयात सध्या 300 बेड आहेत. आणखी 100 बेड सुरू करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याची तयारी करण्यात येत आहे. यातील 350 ऑक्सिजन बेड आणि अति दक्षता विभागात 50 बेड होतील. त्यासाठी 20 केएलची टॅंक आहे. तसेच 800 सिलिंडर आहेत. जे बॅकअपसाठी वापरले जातात अशी माहिती डॉ. गगणे यांनी दिली.
या बैठकीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, कस्तूरबा रुग्णालयचे सागर मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे, डॉ. अभ्युदय मेघे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी साधेपणाने आणि कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी ध्वजारोहण केले. तसेच पोलिस विभागाची मानवंदना स्वीकारली. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे यांची उपस्थिती होती.
वर्ध्यातील झेंडावंदन आणि बैठक आटोपून पालकमंत्री आर्वी उपविभागात पोहोचले. येथे त्यांनी आर्वी, आष्टी आणि कारंजा रुग्णालयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उत्तम उपचार करण्यासाठी औषधीची कमतरता असल्यास तात्काळ मागणी नोंदवा, तसेच रुग्णालयात 50 बेडची वाढ करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या बैठकिला उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, माजी आमदार अमर काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, वैद्यकिय अधिक्षक डॉ. एम.एस. सुटे, तहसीलदार विद्याधर चव्हाण, नगर परिषदचे मुख्याधिकारी उपस्थित होते. आष्टी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरशिया शेख, तहसीलदार आशिष वानखेडे, नायब तहसीलदार राम कांबळे, मुख्याधिकारी मनोजकुमार यहा व कारंजा येथे डॉ. वंजारी यांची उपस्थिती होती. आर्वी व कारंजा येथे कोरोनाबाधिताचा रिकव्हरी दर चांगला असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीत यावेळी आष्टी येथील नवीन रुग्णावाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.