यवतमाळ : यंदाच्या हंगामातदेखील बॅंकांनी अडवणुकीचे धोरण अवलंबिले असून, कासवगतीने पीककर्ज वाटप होत आहे. आतापर्यंत केवळ 32 टक्केी पीककर्ज वाटप झालेले आहे. त्यातही जिल्हा बॅंकेने पीककर्ज वाटप केल्याने पीककर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच आहे. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे.
पीककर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून बॅंकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट्य टार्गेट दिलेले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामात पेरणी करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची कर्जवाटपाची गती अधिक आहे. मे महिन्यात उद्दिष्ट्यांच्या 80 टक्के पीककर्जाचे वाटप जिल्हा बॅंकेने केले आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंकांत सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याची ओरड आहे. या 2021-22साठी राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकांना दोन हजार 210 कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य देण्यात आले. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टांच्या 80 टक्के पीक कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेने केवळ 18 टक्के कर्जवाटप केले. ज्या बॅंकेत शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांना वेळेत पीककर्ज देण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. निसर्गाचा लहरीपणा, दुबार पेरणी, नापिकी, सावकारी कर्ज, फवारणीचा फास, फसवी ठरलेली कर्जमाफी, शासनाच्या मदतीची पोकळ घोषणा यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. त्यात कोणताच हंगाम शेतकऱ्याला साथ देताना दिसत नाही. घाम गाळून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेले शेतकरी यंदातरी उत्पन्न होईल, या एकमेव आशेने खरिपात राबराब राबण्याची तयारी ठेवतात. बॅंकांना ताळ्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिलेत, असे असतानाही बॅंकांच्या कामाची गती वाढविलेली दिसत नाही.
“मध्यवर्ती’च ठरतेय अव्वल
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीक कर्जवाटपात यंदाही भरारी घेतली आहे. बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या नेतृत्वात मे महिन्यातच बॅंकेने 80 टक्के पीक कर्जाचे वाटप केले. ही गती कायम राहिल्यास मे महिन्यातच जिल्हा बॅंक शंभर टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करून नवीन रेकॉर्ड निर्माण करण्याची शक्य ता नाकारता येत नाही.