उल्हास मेश्राम ः दिव्य निर्धार प्रतिनिधी
साळवा(कुही) ः राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून कुही तालुकासुद्धा सुटला नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांची फौज निर्माण होत आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मातोश्री प्रभा सेवा मंडळाच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी केली.
युवक आपल्या क्षमतेनुसार शिक्षित झाला असून शैक्षणिकदृष्ट्या हाताला काम मिळत नसल्याने नैराश्य व व्यसनाधीनतेचे प्रमाण त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. तेव्हा शासनाने येथील कृषी उत्पादनावर एखादा उद्योग सुरू करावा, अशी मागणी मातोश्री प्रभा सेवा संस्था साळवाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी नुकतीच पत्रपरिषद केली. ते म्हणाले, केवळ शेती हाच एकमेव व्यवसाय आहे. तसेच सर्वांत शेवटच्या टोकाला असलेला कुही तालुका मागासलेला तालुका म्हणून समजला जातो. येथे छोटे छोटे उद्योग आहेत. तालुक्यात एमआयडीसी आहे. परंतु पाहिजे त्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. तसेच एमआयडीसी आणि इतर ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी येथील जागा अधिग्रहीत करून ठेवल्याचे समजते.
मात्र, पाहिजे त्या प्रमाणे उद्योगनिर्मिती झालेली नाही. तालुक्यात अनेक युवक उच्चशिक्षित आहेत. परंतु त्यांच्या योग्यतेनुसार काम नसल्याने त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन ते व्यसनाधिनतेच्या आहारी जात असल्याचे दिसून येते.
अशातच झटपट श्रीमंतीची ओढ असल्याने आयपीएल व पब्जीसारख्या खेळावर सट्टाबाजी खेळावर सट्टाबाजी खेळून हजारो रुपये हारतो आहे. तेव्हा पैशांचा तुटवडा व ब्रोकर यांच्या धमक्यांमुळे युवक आत्महत्या करीत असल्याचा आरोपही प्रमोद घरडे यांनी केला. गेल्या दोन महिन्यात तर सात, आठ युवकांनी गळफास व विष प्राशन करून जीवन यात्रा संपविली. एमआयडीसीमधील ज्या-ज्या व्यावसायिकांनी भूखंड अधिग्रहीत करून ठेवले आहेत, त्यांना उद्योगात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे लेखी निवेदन केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी दिली आहे. पत्रपरिषदेत बाबाराव सायरे उपस्थित होते.