अमरावती ः अचलपूर तालुक्यातील व चिखलदरा, अकोट तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या जनुना येथे किडनी आजाराने कहर केला असून गेल्या सहा महिन्यांत गावातील बारा लोकांचा मृत्यू झाला. पंधरा रुग्ण किडनी विकाराने ग्रस्त असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव थोरात यांनी सांगितले.
जनुना येथे प्रामुख्याने गवळी व धनगर समाज वास्तव्यास आहे. गावात भयावह अवस्था असून कोरोना आजारापेक्षाही किडनीच्या धास्तीने येथील नागरिक भयभीत झाल्याचे दिसून आले. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सदर गाव डोंगराळ भागात असून पाणीपातळी पाचशे फुटांच्या खाली गेल्याने क्षारयुक्त पाणी पिल्याने हे आजार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गावाच्या बाजूला शहानूर प्रकल्प आहे. या प्रकल्पात येथील नागरिकांची हजारो हेक्टर जमीन शासनाने संपादित केली. या धरणातून अंजनगावसुर्जी, दर्यापूर व अचलपूर तालुक्यातील काही गावांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा होतो. मात्र या गावालाच पाणी मिळत नसल्याने आजाराचे प्रमाण वाढले. त्यामुळे येथील नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप गोडू येवले, साहेबराव थोरात, उपसरपंच गोपाल जामकर व नारायण नाईक यांनी केला. ही गंभीर बाब लक्षात घेता प्रशासनाने लक्ष न दिल्यास किडनी रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या गावाकडे आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
वर्षातून दोन वेळा पावसाळ्यापूर्वी व नंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचारी यांच्यासह आम्ही घेतो व त्यांच्याच मार्फत अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवितो. मात्र त्याचा अहवाल आम्हाला कळविल्या जात नाही.,असे आरोग्यसेवक अभिलाष धोटे यांनी सांगितले.
किडनीच्याच आजाराने मृत्यू झाले, हे निश्चित सांगता येत नाही. येथील ग्रामस्थ सतत जनावरांच्या चाऱ्याच्या निमित्ताने भटकंतीवर असतात. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी असल्याने हा त्रास उद्भवते. आम्ही शुद्धीकरण संयत्र बसवण्याचे नियोजित केले आहे. पिण्याचे पाणी शुद्ध देण्याचा प्रयत्न करू, असे वाघडोह गटग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी,
प्रशांत हिवे यांनी सांगितले.