नागपूर ः नागपूर महानगर पालिकेत बाबासाहेबांच्या विचारांचे वावडे असल्याचे वारंवार दिसून आले. आता तर त्यांनी ५० वर्षापूर्वी बांधलेल्या आंबेडकर भवनावर बुलडोजर फिरविला. हा बुलडोजर इमारतीवर नाही तर बाबासाहेबांच्या विचारावर फिरविल्याची भावना आता नागपुरातील आंबेडकरी समाजात होत आहे. यात एका माजी मंत्र्याचा हात असल्याचे बोलल्या जाते. त्यांनी पर्यटनाकरिता या जागेची मागणी केली होती आणि त्या स्वतःची संस्था उभारायची असल्याची चर्चा आहे. भवन पाडल्याच्या विरोधात अनेकांनी निवेदन देत घटनेचा निषेध करीत आहेत
धार्मिक, सामाजिक, राजकीय वारसा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे नूतनीकरण करण्याची मागणी असताना अचानक जमीनदोस्त करणे म्हणजे हे एकप्रकारचे षडयंत्र आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महानगरपालिका दोषी असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोले, संदीप सहारे, उज्ज्वला बनकर, भावना लोनारे, स्नेहा निकोसे यांच्यासह कॉंग्रेस सचिव विवेक निकोसे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली.अंबाझरी तलावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात असून आज पाहणीसाठी गेलेल्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांना पोलिसांनी अडवले. भाजपच्याच नजिकच्या लोकांनी हे भवन पाडले असून याप्रकरणी चौकशीची मागणी कॉंग्रेस नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी केली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करीत नगरसेवकांनी मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकांना घेराव केला. मनपा सभागृहात याबाबत कुठलाही ठराव मंजूर नसताना डॉ. आंबेडकर भवन तोडणे अवैध असल्याचे नगरसेवक मनोज सांगोळे म्हणाले. याप्रकरणी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवित खोटे वक्तव्य केले असून सत्य लवकरच बाहेर येईल, असे विवेक निकोसे म्हणाले. याप्रकरणात तत्काळ चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मिलिंद सोनटक्के, सूरज आवळे, राज खत्री, संतोष लोणारे, पीयूष लाडे, अमोल लोणारे, प्रशांत उके, पवन सोमकुवर, बादल वाहने, टिंकु कांबळे, संकेत लामघरे, अर्जुन कोलते, दिनेश लाडे, विवेक भगत आदी उपस्थित होते.