



अमरावती ः विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 110 सुवर्णपदके, 22 रौप्य पदके व 22 रोख पारितोषिके, असे एकूण 154 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तब्बल 65 मुलींनी विविध पारितोषिके पटकावली, तर मुलांची संख्या 18 होती. सर्वाधिक पदके अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजस दिनेश राठी याने पटकावली. मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची विद्यार्थिनी सारिका विष्णुपंत वनवे हिने पटकावले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली असून सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे. आज झालेल्या आभासी पद्धतीच्या दीक्षांत सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यायरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
डी. लिट. पदवीचा स्वीकार शंकरबाबा पापळकर यांनी केला, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. या समारंभामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेता आले नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाने कोव्हिड लॅबमध्ये पावणेचार लाख चाचण्या, नॅकला प्रस्ताव पाठविला, डिजिटायझेशन, आपत्ती व्यवस्थापन, जलसंवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प, विविध विकासकामांसाठी प्राप्त केलेला निधी, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, पेटेंट आदींची माहिती यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिली.
मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एफ. सी. रघुवंशी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा डॉ. डी. डब्ल्यू. निचित व आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे यांनी आचार्य पदवीधारक, पदवीकांक्षींना सुवर्ण पदक, रौप्य पदक व रोख पारितोषिकास प्राप्त ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्याची अनुज्ञा घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. संचालन मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे व डॉ. प्रणव कोलते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने झाली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या चमूने गीताचे सादरीकरण केले.
शंकरबाबा पापळकर यांना डी. लिट.
थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना मानद मानवविज्ञान पंडित (डी. लिट.) ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन कुलपतींच्या वतीने कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सन्मानित केले. याप्रसंगी त्यांचा गौरवपत्र, शाल व गाडगेबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. शंकरबाबांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली