चंद्रपूर : राखी कंचर्लावार यांच्या कार्यकाळात महापौर चषक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात झाली. यासाठी 25 लाख 79 हजार 85 रुपयांचे निधी मंजुर करण्यात आला. परंतु महापौर चषकात सुद्धा लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.
महापौर राखी कंचर्लावार आणि तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या काळात सन 2015 ते 2016 या आर्थिक वर्षात दोनशे कोटी 33 लाख रुपयांची अनियमितता झाल्याची धक्कादायक बाब लेखा परीक्षण अहवालातून उघड झाली आहे. येत्या ्31 मे रोजी होणाऱ्या आमसभेत हा लेखा परीक्षण अहवाल सभागृहात ठेवला जाईल. अहवालात 71 कामांवर लेखी आक्षेप घेण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झालाच. मात्र विवाह प्रमाण, मृतांच्या अंत्यसंस्काराचे अनुदान आणि महापौर चषकात सारख्या छोट्या अंदाजपत्रकांच्या कामातही हात ओले करण्याचा मोह मनपाच्या शिलेदारांना आवरता आला नाही.
राखी कंचर्लावार यांच्या कार्यकाळात महापौर चषक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात झाली. यासाठी 25 लाख 79 हजार 85 रुपयांचे निधी मंजुर करण्यात आला. परंतु महापौर चषकात सुद्धा लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. या कामातील कंत्राटदारांनी वाढीव देयक सादर केली. मनपाने ती मान्य केली. देयक सादर करताना केलेल्या कामांचा पुरावा जोडावा लागतो. कंत्राटदाराने असा कोणताही पुरावा जोडला नाही. महापौर चषकात 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2016 याकाळात गांधी चौक येथे कुस्ती स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेकरिता मे. शिव- पार्वती बिछायत यांनी मंडप आणि इतर साहित्याचा पुरवठा केला होता. त्याने न केलेल्या कामांची देयक मनपाने मंजुर केली. महापौर चषक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे फलक, फ्लेक्से लावण्याचे काम न्यू. श्रीराम प्रिंन्टर्स कडे सोपविण्यात आले. परंतु मनपा हद्दीत नेमके कोणत्या ठिकाणी आणि किती फ्लेक्सय लावण्यात आले. याची कोणतीही माहिती मनपाला नाही. त्याउपरही देयक मंजुर करण्यात आल्याचा आक्षेप लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आला आहे. चंद्रपूर मनपाच्या 2015 ते 2016 या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण औरंगाबाद येथील पथकाने केले. अहवालात अनेक खळबळजनक बाबी उघड झाल्या आहेत.
अंत्यविधीची रक्कम लाटली
मनपाच्या 24 फेब्रुवारी 2015 च्या आमसभेत शहरातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अनुदान नियम, अटी नुसार पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्र आणि अर्जाचा पडताळणी करून देण्यात यावे, असे ठरले. परंतु प्रत्यक्षात अनेक प्रकरणात या रक्कमेची उचल कुणी केली, याची माहितीच मनपाकडे नसल्याचे समोर आले. मृताच्या नावावर मात्र अंत्यसंस्काराची रक्कम दिल्याचे नमूद आहे. ती नेमकी कुणाला दिली. याची माहिती मनपाला नाही. अशा अनेक प्रकरणांचा उलगडा लेखा परीक्षण अहवालात झाला आहे. एकीकडे या काळात मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू असताना साध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीच्या शुल्काची रक्कम सुद्धा लाटल्याचा प्रकार समोर आला. ही रक्कम शासकीय कोशागारात जमा करणे आवश्याक आहे. परंतु मनपाने केली नाही. ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे लेखा आक्षेपात सुचविले आहे.
हा प्रशासनाचा विषय आहे. यातील अनियमितता कशा दूर करायच्या हे प्रशासन ठरवेल. 31 मेच्या आमसभेत लेखापरीक्षण अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे.
– राखी कंचर्लावार, महापौर, चंद्रपूर
मनपाच्या पारदर्शक प्रशासनाच्या चिंधड्या उडविणारा हा लेखा परीक्षण अहवाल आहे. या अहवालानुसार कोट्यवधी रुपयांची रक्कम कंत्राटदारांनी अतिरिक्त दिली आहे. तिची वसुली आता मनपाकडून झाली पाहिजे.
– संजय वैद्य, माजी नगरसेवक, चंद्रपूर