दिव्य निर्धार प्रतिनिधी
नागपूर : अलिकडेच चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटल्याची घटना इतवारी रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी चोराचा शोध घेण्यासाठी पोलिस गेले. सीसीटीव्हीत कृत्य कैद झाल्याचे चोराला ठासून सांगितले. मात्र, चोर म्हणाला… काहीही सांगता साहेब… असे होवूच शकत नाही. सीसीटीव्ही तर चार महिन्यांपासून बंद आहे. चोराचे हे वाक्य ऐकताच पोलिसही बुचकळ्यात पडले.
सुरक्षा कर्मचारी नसले तरी तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीचा धाक असतो. चोरांना धडकी भरते. गुन्हेगारीवर आळा बसतो. परंतु इतवारी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही यंत्रणा बऱ्याच कालावधीपासून ठप्प असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २३ पैकी तब्बल १५ कॅमेरे बंद आहेत. विशेष म्हणजे या विषयी चोरांनाही माहीत आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इतवारी रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. एकूण २३ कॅमेरे लावण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विकास कामे सुरू आहेत. फूट ओव्हर ब्रिजच्या कामासाठी तोडफोड करण्यात आली. यामुळे यंत्रणेचे केबल क्षतिग्रस्त होऊन १५ कॅमेरे बंद पडले आहेत. विकास कामे कासव गतीने सुरू असल्याने याचा फटका गरीब प्रवाशांना बसतो. अलिकडेच गोंदियाचे पोलिस एका चोरी प्रकरणाच्या तपासासंदर्भात इतवारी रेल्वे स्थानकावर आले. मात्र, सीसीटीव्हीच बंद असल्याने त्यांना मागल्या पावलीच परतावे लागले.
सीसीटीव्ही बंद असल्याविषयी एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. रेल्वे प्रशासनानुसार हा विषय सुरक्षा दलाशी संबधित आहे. तर आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या सीसीटीव्ही यंत्रणा स्टेशन मास्तरांच्या अंतर्गत असल्याचा दावा केला. अलिकडे इतवारी स्थानकावरील आरपीएफ ठाण्यासमोरच असलेल्या कॅन्टीनमध्ये चोरी झाली होती. काही दिवसांतच पुन्हा स्टेशन परिसरात चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही प्रकरणांमध्ये कौशल्याचा उपयोग करीत आरोपींना अटक केली.
विकास कामे पूर्ण होताच सुरक्षा मजबूत
निर्भया फंड अंतर्गत रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रस्ताव आहे. इतवारी रेल्वेस्थानकाला त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेले बांधकाम पूर्ण होताच अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाणार आहे. स्टेशनशी संबंधित असणारा प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणला जाणार आहे.