

विलास शेवाळे ः दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर : आदर्श नगर, उमरेड रोड परिसरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य आणि भक्तिमय वातावरणात सोहळा उत्साहात पार पडला. मागील २८ वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव यंदाही मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आदर्श नगर, धन्वंतरी नगर आणि चिटणीस नगर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी रांगोळी, भगव्या पताका, आकर्षक विद्युत सजावट आणि कमानींनी संपूर्ण परिसर राममय झाला होता. “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.
श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आरतीनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. भगवान श्रीरामांच्या प्रतिमेचा रथ विधिवत पूजन करून मिरवणुकीचे समापन करण्यात आले. शेवटी श्रीराम आणि हनुमानाची आरती करण्यात आली. यंदाच्या शोभायात्रेत विविध महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला. यामध्ये श्रीराम महिला भजन मंडळ, मंगलमूर्ती महिला भजन मंडळ, हरिओम महिला भजन मंडळ, संत तुकाराम महाराज मंडळ, राधाकृष्ण भजन मंडळ आणि जयदुर्गा महिला भजन मंडळ यांचा समावेश होता.
ह.भ.प. देविदास महाराज ढोबळे, रोशन महाराज कळंबे, ईश्वर महाजन उईके यांनी प्रवचन दिले, तर गजानन महाराज कपिले यांनी जन्मोत्सव सोहळा पार पाडला. गोपाल काला कीर्तन महेश महाराज सोनटक्के यांनी सादर केले. या कार्यक्रमाला परिसरातील आदर्श नगर, धन्वंतरी नगर, चिटणीस नगर, प्रगती कॉलनी, सर्वश्री नगर, पवनसुत नगर, गाडगेबाबा नगर आदी भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला श्रीराम देवस्थान पंच कमेटीचे प्रमुख प्रदीप वाढीभस्मे, शुभाषजी वारोकार, त्रिलोचन खरवते, भैयाजी यांच्यासह नागपूरच्या महापौर सौ. नीता ठाकरे, नगरसेवक पिंटू झलके, डॉ. प्रकाश ढगे, राहुल अभंग, किशोर कुमेरिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

