
रुपेश वनवे ः दिव्य निर्धार वृत्तसेवा
रामटेक : महाराष्ट्रातील विविध भागांत अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त व अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्रीविरोधात कारवाई सुरू असताना रामटेक परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधील स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागांनी रामटेक शहरासह बसस्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रामटेक बसस्थानक परिसरात दररोज विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच प्रवासी या परिसरातील हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर नाश्ता व भोजन करतात. मात्र, काही ठिकाणी ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. काही हॉटेलमध्ये आरओ पाण्याची सुविधा असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची गरज आहे.
२० रुपयांचा नाश्ता केल्यानंतरही दर्जाहीन किंवा पिण्यायोग्य नसलेले पाणी
याशिवाय पाणीपुरी, पावभाजी, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, हाताळणीची पद्धत, परिसरातील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता यांचीही नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी २० रुपयांचा नाश्ता केल्यानंतरही दर्जाहीन किंवा पिण्यायोग्य नसलेले पाणी मिळत असल्याने ग्राहकांना २० रुपयांची पाण्याची बाटली स्वतंत्रपणे खरेदी करावी लागत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, खाद्यपदार्थाच्या किमतीपेक्षा पाण्यासाठी होणारा खर्चही नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. तहसील प्रशासन, नगर परिषद आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवून हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावेत. नियमांचे उल्लंघन अथवा खाद्यपदार्थ व पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी साठवून ठेवताना त्याची गुणवत्ता खराब होणार नाही, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य पद्धतीने शुद्धीकरण, निर्जंतुकीकरण आणि सुरक्षित साठवणूक करूनच ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.”
—रजत ईश्वरजी गजभिये
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, रामटेक तथा नगरसेवक, रामटेक

