
रमेश लांजेवार ः दिव्य निर्धार वृत्तसेवा
कुही/नागपूर : आयुष्यभर कुटुंबासाठी धावपळ केली… मुलांना मोठे केले… नातवंडांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहण्यातच स्वतःचे सुख मानले. अशाच काही ‘आईबाबांच्या’ आयुष्यात गुरुवारी एक अविस्मरणीय दिवस उजाडला. अंगणवाडीतील चिमुकल्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली… समोर केक ठेवला… टाळ्यांचा कडकडाट झाला आणि थरथरत्या हातांनी ज्येष्ठांनी केक कापला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारे आनंदाश्रू उपस्थितांचे मनही हेलावून गेले.
राष्ट्रीय पोषण माहानिमित्त जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हाभर राबविण्यात आलेल्या ‘वाढदिवस आई-बाबांचा’ या अनोख्या उपक्रमातून गावातील अशा ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले, ज्यांचा वाढदिवस यापूर्वी कधीच साजरा झाला नव्हता किंवा ज्यांना केक कापण्याचा आनंद अनुभवता आला नव्हता. अंगणवाडी केंद्रात चिमुकल्यांच्या गराड्यात ज्येष्ठांनी केक कापला. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते, काहींच्या चेहऱ्यावर अविश्वास, तर काहींच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले. आयुष्याची अनेक वर्षे कुटुंबासाठी देणाऱ्या या ‘आई-बाबांना’ पहिल्यांदाच समाजाच्या वतीने मिळालेल्या या प्रेमाने भारावून टाकले. वाढदिवसाचा केक कापताना चिमुकल्यांनी टाळ्या वाजविल्या. अंगणवाडी सेविकांनी शुभेच्छा दिल्या. गावातील नागरिकांनीही या आनंदात सहभाग घेतला. क्षणभर का होईना, पण आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे मागे सोडून हे ज्येष्ठ पुन्हा बालमनात रमले. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. अंगणवाडी सेविकांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात चिमुकल्यांचा सहभाग केंद्रस्थानी होता. ज्येष्ठांना केक भरविण्यापासून शुभेच्छा देण्यापर्यंत त्यांनी आपल्या निरागसपणाने आईबाबांची मने जिंकली. लहान मुलांच्या हातून मिळालेल्या या प्रेमामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी खुलला. गावातील दानशूर नागरिकांनीही या उपक्रमाला हातभार लावला. त्यामुळे अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये साधेपणाने, मात्र अत्यंत जिव्हाळ्याने वाढदिवस साजरे झाले. वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठा खर्च किंवा भव्य आयोजन आवश्यक नसते. एखाद्याच्या आयुष्यात ‘तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात’ ही भावना निर्माण करणारे दोन शब्द आणि मायेने दिलेली साथही पुरेशी असते, हे या उपक्रमातून दिसून आले.
कुही एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प
कुही एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प, कुही अंतर्गत पोषण अभियानाच्या मार्गदर्शनानुसार पचखेडी येथील अंगणवाडीत विविध उपक्रमांनी सामाजिक जाणीवेला उजाळा देण्यात आला. वृद्धापकाळात पाल्यांकडून मिळणाऱ्या प्रेम, सन्मान व आधाराची जाणीव समाजाला करून देण्यासाठी पचखेडी येथील जेष्ठ नागरिक धर्मा ठाकरे आणि पत्नी भिवरा ठाकरे.पांडुरंग मेश्राम व पत्नी पुष्पा मेश्राम.वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील लोकप्रतिनिधींचे तीन ते सहा वर्षे वयोगटातील चिमुकल्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पौष्टिक व सकस आहार कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच दिलीप भोयर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेंडे,ग्रा.प.सदस्या भाग्यश्री नाईक, शेवंता मारबते, अस्मिता भोयर.सुनिता माटे.मुख्याध्यापक गोदरू दहीलकर, मुढे सर, डॉ. भाग्यश्री सुटे, सीमा धनविजय, मलेरिया वर्कर प्रभाकर ढगे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा वनदुधे.कांता मेश्राम.सुनिता मेश्राम.सुनिता शिवनकर.शिला शेंडे.मंगला फुलझेले.अंजली राघोर्ते.मनिषा हलमारे.मनिषा टांगले यांनी अथक परिश्रम घेतले.
‘वाढदिवस आई-बाबांचा’ हा उपक्रम केवळ केक कापण्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यातून ज्येष्ठांचा सन्मान, त्यांच्या भावनांची जपणूक आणि दोन पिढ्यांमधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट झाले. अंगणवाडीत हा उपक्रम झाल्याने सर्वच आनंदी होते. भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येतील.
-डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जि.प. नागपूर
‘वाढदिवस आई-बाबांचा’ हा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नाही. ज्येष्ठांचा सन्मान, त्यांच्या भावनांची जपणूक आणि दोन पिढ्यांमध्ये प्रेमाचा सेतू निर्माण करणारा हा उपक्रम आहे. चिमुकल्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर फुललेले आनंदाचे हास्य हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे.
— विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर

