Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

परिचारिकेच्या प्रतिनियुक्तीवरून दोन विभागप्रमुख आमनेसामने!;  सीईओंनी तातडीने हस्तक्षेप करून वाद मिटवावा; कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची मागणी

दिव्य निर्धार ः वृत्तसेवा
नागपूर : जिल्हा परिषद नागपूरच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एका परिचारिकेच्या प्रतिनियुक्तीवरून दोन विभागप्रमुखांमध्ये निर्माण झालेला वाद आता प्रशासनाच्या पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही विभागांमध्ये सामंजस्य घडवून आणावे, अशी मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.

संबंधित परिचारिकेची एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यात आलेली प्रतिनियुक्ती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रद्द केली. त्यानंतर संबंधित परिचारिकेला आपल्या विभागात कार्यरत करून घेण्यात आले. यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या विभागात एकही परिचारक उपलब्ध नसल्याने तातडीने परिचारक उपलब्ध करून द्यावा अथवा प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आलेल्या महिला परिचारिकेला पुन्हा त्यांच्या विभागात नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एका परिचारिकेच्या नियुक्तीवरून दोन विभागांमध्ये निर्माण झालेला हा संघर्ष प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अशा वादाचा थेट परिणाम संबंधित कर्मचाऱ्याच्या मनोबलावर होऊ शकतो. तसेच परिचारक संवर्गातही असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिक्त पदांमुळे मनुष्यबळाचा तुटवडा

गेल्या काही वर्षांपासून गट ‘ड’ मधील परिचारक संवर्गाची नियमित सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली आहे. त्याऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे परिचारक उपलब्ध करून घेण्याचे धोरण राबविले जात आहे. बदली, पदोन्नती आणि सेवानिवृत्तीमुळे नियमित परिचारकांची संख्या सातत्याने कमी होत असून, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. उपलब्ध परिचारकांची संख्या अपुरी असल्याने एका विभागातील कर्मचाऱ्याला दुसऱ्या विभागात प्रतिनियुक्त करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेवरून विभागांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

नियमित भरतीची मागणी

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने परिचारक संवर्गातील रिक्त पदे नियमित भरतीद्वारे भरण्याची मागणी अनेकदा शासनाकडे केली आहे. मात्र, नियमित भरतीऐवजी बाह्यस्त्रोतावर भर दिल्यामुळे त्याचे प्रशासकीय परिणाम आता समोर येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिचारकांची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, सध्याच्या प्रतिनियुक्तीच्या वादावर सामंजस्याने तोडगा काढावा आणि संबंधित महिला कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

आदर्श नगर, उमरेड रोड येथे रामनगरीचा अवतार; रामनामात रंगला भक्तांचा जनसागर

divyanirdhar

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण कसं मिळालं? …वाचा

divyanirdhar

निर्ढावलेल्या विकृतीला आवरा?

divyanirdhar

बोरीच्या धरतीधन सीड कंपनीवर गुन्हा दाखल; चार कोटी 20 लाखांचा माल जप्त

divyanirdhar

जिल्हा परिषदेत भाजपचा स्वबळाचा नारा; १६ जागा जिंकण्याचा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांचा दावा

divyanirdhar

म्हसली येथील ग्रामपंचायतीत घोळच घोळ

divyanirdhar