जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
दारव्हा ( यवतमाळ) : तालुक्यातील बोरी येथील धरतीधन सीड्स व प्रोसेसिंग प्लांटच्या मालकावर शासनाची दिशाभूल व शेतकर्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संजय सोहनलाल मालानी (वय 54, रा. बोरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याचबरोबर चार कोटी 20 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या तीन पथकांनी ही कारवाई केली.
बोरी येथील यवतमाळ मार्गावरील या बियाणे कंपनीला कृषी आयुक्तालयाकडून बियाणेविक्रीसाठी व राज्य बीजप्रमाणीकरण यंत्रणा अकोला यांच्याकडून बीजप्रक्रिया केंद्राचा परवाना प्राप्त झाला आहे. परंतु, या ठिकाणी बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यादृष्टीने तपासणीकरिता कृषी विभागाच्या पुणे, अमरावती, यवतमाळ, दारव्हा येथील अधिकार्यांनी शुक्रवारी (ता.4) दुपारी या कंपनीत धडक दिली. त्यावेळी कंपनीच्या प्लांटमध्ये सोयाबीन बियाणे चाळणी लावून प्रतिबॅग 30 किलोप्रमाणे पॅकिंग करीत असल्याचे निदर्शनास आले. बॅगवर उत्पादकप्रक्रिया व विपणन व बियाण्याच्या गुणवत्तेबाबत जबाबदार कंपनीचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक यांसारख्या कोणत्याही बाबींचा उल्लेख नाही. तथापि बॅगवर प्रमाणित बीज असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच बॅगवर बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक असलेल्या बाबींचा उल्लेख नाही. प्रमाणित बियाणेसंदर्भात उपलब्ध साठा व केलेली विक्री त्याबाबतची देयके यासंदर्भात कोणताही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. शिवाय सत्यतादर्शक बियाण्यांबाबत बिजोत्पादनासाठी वापरलेले उगम बियाणे, खरेदीची पावती, शेतकर्यांची यादी, त्यापासून उत्पादित झालेले एकूण बियाणे यामधून विक्रीयोग्य शुद्धबियाणे, गुणवत्ता तपासणीचा प्रयोगशाळेचा अहवाल, वीज उत्पादक शेतकर्यांना बियाण्यापोटी अदा केलेली रक्कम यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे कंपनीमालकाने बाजारातील धान्यस्वरूपातील सोयाबीन खरेदी करून त्याची बियाणे म्हणून विक्री करण्याच्या उद्देशाने सदरची सर्व प्रक्रिया केलेली आहे, हे सिद्ध होते. त्यावरून बियाणे नियम 1968चे कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13 व 14चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. यावेळी सोयाबीनचा 152.70 क्विंटल साठा व तुरीचे 4,960 किलोचे पॅक बियाणे आढळून आले. याशिवाय या कंपनीच्या गोदामात सोयाबीनचे बियाणे असलेल्या पोत्यात भरलेले असल्याचे आढळून आले. कंपनीच्या परिसरात एका एम. एच.30-1805 या क्रमाकांच्या ट्रकमध्ये 250 पोते 25 टन वजनाचे सोयाबीन असल्याचे निदर्शनास आले. गोदामामध्ये विविध कंपन्यांच्या बियाणे भरलेल्या व काही रिकाम्या पिशव्यादेखील निदर्शनास आल्या. पोत्यात अंदाजे 1,729 क्विंटल तूर व 660 क्विंटल सोयाबीन तसेच दोन हजार 700 क्विंटल हरभरा असल्याचे निदर्शनास आले. या सर्व बियाण्यांची किंमत चार कोटी 19 लाख 92 हजार रुपये आहे.
शासनाची दिशाभूल करण्यासह शेतकर्यांची फसवणुकीची फिर्याद
या सर्व प्रक्रियावरून संबंधित मालक संजय मालाणी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची दिशाभूल व शेतकर्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने सर्व प्रकार केल्याचे निदर्शनास येते, अशा प्रकारची फिर्याद तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात व पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांनी पोलिस ठाण्यात देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यावरून कंपनीचे मालक संजय मालानी यांच्याविरुद्ध बियाणे कायदा 1966 कलम 7 बियाणे नियम 1968 बियाणे नियंत्रण आदेश 1983 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3 व 7 भादंविचे कलम 420, 463,465, 468 व 471नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास ठाणेदार यशवंत बाविस्कर करीत आहेत.