जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
नागपूर : अन्न व नागरीपुरवठा विभागाच्या वतीने उन्हाळी ज्वारी शासकीय खरेदीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकरी तीन क्विंटलऐवजी राज्य शासन एकरी 12 क्विंटलपर्यंत हमी भावाने उन्हाळी ज्वारी खरेदी करेल. ज्वारी खरेदी मर्यादेत वाढ करण्यात यावी म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालन हुकूमचंद आमधरे यांनी वेळेवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच विविध बैठकामध्ये त्यांनी हा विषय लावून धरला होता. शेवटी शासनाने त्यांच्या मागणीकडे लक्ष देत ज्वारी खरेदी मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात दोन हजार 110 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीची लागवड करण्यात आली. यावेळी पोषक हवामानामुळे शेतकर्यांना एकरी 17 ते 20 क्विंटलपर्यंत उतारा आला. या ज्वारीच्या शासकीय खरेदीला दोन हजार 600 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. मात्र, खासगी बाजारपेठेत 1,300 ते 1,500 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. परंतु, शासकीय खरेदीची मर्यादा मागील हंगामाच्या उत्पादकतेनुसार एकरी केवळ तीन क्विंटल ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान अपेक्षित होते. त्यानुसारही उत्पादकता प्रतिहेक्टरी 29 क्विंटल अर्थात एकरी 11.6 क्विंटल एवढी आहे. त्यानुसार आता ज्वारीची शासकीय खरेदी शेतकर्यांकडून करण्यात येईल.
आमधरे यांनी दिला सावधानेचा इशारा
शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदीपासून साधव राहावे. चांगल्या कंपनीचे बियाणे खरेदी करावे. कृषी अधिकाऱ्याचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा तर कोणत्याही अफवेपासून शेतकऱ्यांनी सावध असावे, असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालन हुकूमचंद आमधरे यांनी केले आहे.