Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

तितूर ग्रामसभा अर्धवट; शाळेच्या खोलीत प्रोसिडिंगचा ‘खेळ’!

रमेश लांजेवार ः दिव्य निर्धार वृत्तसेवा
तितूर : ग्रामसभा अर्धवट राहिल्यानंतर तिच्या प्रोसिडिंग बुकमध्ये शाळेच्या खोलीत नोंदी केल्याच्या आरोपाने गट ग्रामपंचायत तीतूरमध्ये खळबळ उडाली आहे. ३ सप्टेंबर रोजीची ग्रामसभा अपूर्ण असताना १७ सप्टेंबरला ग्रामसभेचे प्रोसिडिंग बुक नागेश्वर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कक्षात नेऊन संगणक ऑपरेटर अमित बबन मानकर नोंदी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओही तयार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, प्रोसिडिंग बुकच्या हाताळणीसह ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ग्रामसभा अपूर्ण असताना नोंदी कशा?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ३ सप्टेंबर रोजी ग्रामसभा सुरू असताना ग्रामसेवक मधूनच निघून गेल्याने सभा अर्धवट राहिली. ग्रामसभा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी लेखी अर्ज दिला होता. मात्र, सभा पूर्ण झाली नसतानाही १७ सप्टेंबरला प्रोसिडिंग बुक शाळेच्या खोलीत नेऊन नोंदी केल्या जात असल्याचे आढळून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेचे अधिकृत दस्तऐवज ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नेण्यास परवानगी कोणी दिली? शाळेच्या खोलीत नेमक्या कोणत्या नोंदी करण्यात आल्या? त्या नोंदी ग्रामसभेत प्रत्यक्ष मंजूर झाल्या होत्या का? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून प्रोसिडिंग बुकमधील नोंदींची सत्यता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

वैयक्तिक युपीआय,आयपीपीबी स्कॅनरवरून शुल्कवसुलीचा दावा
ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक कक्षात विविध दाखले व प्रमाणपत्रांसाठी नागरिकांकडून वैयक्तिक UPI आणि IPPB स्कॅनरच्या माध्यमातून पैसे स्वीकारले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. जन्म-मृत्यू दाखले तसेच सेतू केंद्राशी संबंधित कामांसाठी अधिकृत पावती न देता वैयक्तिक स्कॅनरवर पैसे घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामसभेत या उत्पन्नाबाबत विचारणा झाली असता दोन वर्षांचे उत्पन्न केवळ १,८०० रुपये दाखविण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती रक्कम जमा झाली, किती व्यवहार झाले आणि संबंधित रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्यात आली का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

माहिती अधिकार अर्जानंतर स्कॅनर हटविल्याचा आरोप
ग्रामस्थांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितल्यानंतर संबंधित अर्ज संशयित ऑपरेटरच्या हाती दिल्याचा आरोपही केला आहे. त्यानंतर संगणक कक्षातील वैयक्तिक युपीआय,आयपीपीबी स्कॅनर हटविण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांचा तपशील, शुल्कवसुलीच्या पावत्या आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक नोंदींचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कारवाई न झाल्यास पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, प्रोसिडिंग बुक ताब्यात घेऊन नोंदींची सत्यता पडताळावी, वैयक्तिक युपीआय,आयपीपीबी व्यवहारांची तपासणी करावी तसेच माहिती अधिकार प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा आणि ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते सूरज काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी पंकज मेश्राम, आयुष पोटफोडे, राजेंद्र मेश्राम, उमेश गोडे, आनंदा मानवटकर, माधव गावंडे, राजू शहाणे, शेखर कानफाडे, प्रफुल काकडे, शीतल झंजाड, अमोल झंजाड, किसना काकडे, गुड्डू वाघ, नितीन गौरकार, सिद्धार्थ वसंत मेश्राम यांच्यासह तीतूर ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

माजी मंत्री रमेश बंग गरजले, म्हणाले, पेट्रोलचे भाव कमी करा नाही तर खूर्ची खाली करा…

divyanirdhar

दवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक

divyanirdhar

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

divyanirdhar

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

divyanirdhar

जिल्हा भूमापन अधिकाऱ्यांनी दिला ‘कांदा’ ठेवण्याचा सल्ला;भरउन्हात बांधावर; वरिष्ठांच्या आडमुठे धोरणामुळे कर्मचारी झाले हैराण

divyanirdhar

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरीः भाजपचा निधान, कॉंग्रेसचा ज्योती राऊत यांना धक्का

divyanirdhar