नागपूर ः मी बंडखोर नाही, भाजपचा आजन्म कार्यकर्ता आहे. मला राजकारणात असलो तरी तरी पक्षापेक्षा कोणी मोठे नाही. वैयक्तिक कारणास्तव जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हतो. मात्र शेवटपर्यंत मला पक्षातून आग्रह करण्यात आला. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला, असे माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी जाहीर केले. अनिल निधान हे भाजपचे बंडखोर उमेदवार असल्याच्या अफवा पसरल्यानंतर त्यांनी आपला खुलासा जाहीर केला.
नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये गुमथळा महालगाव सर्कलमधून अनिल निधान उमेदवारी लढवत नसून त्यांनी पक्षासोबत बंडखोरी केली अशा आशयाचे वृत्त मागील काही दिवसांमध्ये काही वृत्तपत्रातून प्रकाशित झाले होते. या सर्व वृत्तांचे अनिल निधान यांनी खंडन करीत गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबाबत सांगितले की, त्यांचा भावाचे नुकतेच निधन झाले. तसेच कौटुंबिक समस्येमुळे यावेळेस जिल्हा परिषद पोटनिवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. याविषयी भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष अरविंदजी गजभिये यांना सांगितले होते. तसेच माझ्या ऐवजी योगेश डाफ यांना उमेदवारी देण्यात यावी असेही सुचविले होते. अनिल निधान यांची समस्या ऐकून चंद्रशेखरजी बावनकुळे व जिल्हाध्यक्ष अरविंदजी गजभिये यांनी गुमथळा-महालगाव सर्कलकरिता मला शेवटपर्यंत निवडणूक लढण्यास सांगितले होते. त्यानंतर आग्रहाखातर योगेश डाफ व अनिल निधान यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. आमच्या दोघांचेही बी-फार्म माझ्याजवळ देण्यात आले होते. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सर्व घाईगडबडीत आणि अर्ज केल्यानंतर बी-फार्मसोबत घेऊन येत असताना वाहन खराब नादुरुस्त झाले. वेळेपर्यंत बी-फार्म जोडता आले नाही. त्यामुळे दोघांचे अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य पकडण्यात आले, असे निधान यांनी सांगितले.
याप्रसंगी अनिल निधान यांनी सांगितले की, जरी माझा अर्ज अपक्ष असला तरी पक्षाकडून तसेच प्रदेश महामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व जिल्हाध्यक्ष अरविंदजी गजभिये यांनी मला अपक्ष व भाजप समर्थीत उमेदवार म्हणून गुमथळा-महालगाव जि.प. सर्कल मधून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे गुमथळा महालगाव जिल्हा परिषद सर्कलमधून पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, किशोर रेवतकर,अजय बोढारे, किशोर बेले, कपिल आदमने उपस्थित होते.
previous post