उल्हास मेश्राम ः दिव्य निर्धार प्रतिनिधी
कुही(नागपूर) ःगेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा आदिवासींसाठी लढा सुरू आहे. त्यांचे संविधांनिक हक्क मिळावे याकरिता हा लढा आहे. मात्र, शासन त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या आदिवासीबांधवांनी कुही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांच्या या सांविधानिक आंदोलनात नागपूर जिल्ह्याचे नेते आणि कुही-उमरेड-भिवापूर क्षेत्राचे लोकमान्य नेते प्रमोद घरडे यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला बळ मिळाले.
आदिवासींच्या सांविधानिक हक्क व अधिकारासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेला पाठिंबा देत कुही तालुक्यातील आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले. विविध मागण्या निवेदन तहसीलदार बाबाराव तिनघसे यांना दिले. देशभरात आदिवासींवर होत असलेले अन्याय-अत्याचार बंद करावे आणि त्यांना सांविधानिक हक्क व अधिकार देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. या धरणे आंदोलनाला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी भेट दिली. तसेच आंदोलनाला संबोधित केले. या धरणे आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते राजानंद कावळे, सिद्धार्थ मेश्राम, धम्मपाल मेश्राम, सचिन सोयम,प्रकाश सिडाम ,कुंदाताई सिडाम, सविता उईके, अनुसया धुर्वे, लता इवनाते आदींसह तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.
आदिवासींच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आदिवासी समाज मागास राहिला आहे. सरकारने आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आमची मागणी आहे.
-प्रमोद घरडे, सामाजिक कार्यकर्ता