Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्र

खरंच, आपण बौद्ध आहोत?

-प्रा. त्रिशिला साळवे तायडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्माबद्दल आस्था आणि आशा होती. ते जरी निरीश्वरवादी असले, तरी धर्माबद्दल सकारात्मक होते. व्यक्तीच्या आयुष्यात विशेषतः गरीब व दुःखी व्यक्तींना संकटप्रसंगी धर्म जगण्याची आशा व प्रेरणा देत असतो; म्हणून ते धर्म नाकारत नाही, तर धर्माची कसोटी उपयुक्तता व न्याय यावर तपासतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्माची सामाजिक उपयुक्ततेच्या संदर्भात चिकित्सा झाली पाहिजे, असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती म्हणजे,‘ हिंदू धर्मात अस्पृश्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसात भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही.’ डॉ. बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली. पण, त्यांनी इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा विचार कधीच केला नाही. कारण, जर या दोन्हींपैकी एक धर्म स्वीकारला, तर त्या धर्मीयांची संख्या वाढून राष्ट्रहिताला धोका निर्माण होईल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. काही वेळ त्यांचा कल शीख धर्म स्वीकारण्याकडे होता. पण, सारासार अभ्यासाअंती त्यांना जाणवले की, जर शीख धर्म स्वीकारला, तर दलित समाज त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड म्हणून हिंदू धर्मीयांचा रक्तपात करायला मागेपुढे पाहणार नाही. म्हणून त्यांनी शीख धर्मही नाकारला आणि १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथे आपल्या अनुयायांसह सत्यावर आधारित असा बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्माची चिकित्सा करून काही पातळीवर नवीन अर्थाच्या संदर्भात तो स्वीकारलेला आहे. कारण, बुद्ध व्यक्तिगत, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व अंगांची गुलामगिरीची बंधने नाकारतो आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही लोकशाहीपूरक मूल्ये स्वीकारतो. बौद्ध धम्म हा जनवादी आहे. कारण, त्यानेच प्रथम दलित, शोषित, पीडित जणांना सामावून घेतले. म्हणून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही धम्माची मध्यवर्ती संकल्पना आहे. हा धम्म ‘केवळ जगात दुःख आहे असे सांगत नाही तर दुःखाला कारणे असतात आणि ती नष्ट करता येऊ शकतात, असा आशावाद व्यक्त करतो.’ मानवी अंत:प्रज्ञा व तर्कविचाराला वेसण न घालता निवड, विचार व कृतीचे स्वातंत्र्य देतो. वैज्ञानिक दृष्टी देतो. म्हणून बाबासाहेबांनी पारंपरिक बुद्ध धम्मातील न पटणाऱ्या बाबींचा अस्वीकार करून बुद्धीला जे पटेल ते स्वीकारून नवोदितांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला. बाबासाहेब बुद्धांच्या शिकवणुकीनुसार बुद्धाला मोक्षदाता न मानता मार्गदाता मानतात आणि ‘अत्त दीप भव’ हा मंत्र अंगीकारतात.
बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बाबासाहेबांनी दलितांना सन्मानाने जगण्याची दिशा दिली. पण, आजची या समाजात स्थिती काय आहे हे डोळ्यांआड सारून चालणार नाही. फक्त बोटांवर मोजण्याइतपत लोक बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेल्या बौद्ध धम्माचे आचरण करताना दिसतात. बाकी इतर लोकांना धर्म आणि धम्म याचाही विसर पडलेला आहे. धर्माचा संबंध देवाशी आहे तर धम्माचा संबंध मानवाशी आहे. धर्म बुद्धिप्रामाण्य नाकारतो, तर धम्म बुद्धिप्रामाण्य मानतो. धर्म म्हणजे बंधन तर धम्म म्हणजे स्वातंत्र्य. धर्म म्हणजे दैववाद तर धम्म म्हणजे विज्ञानवाद. धर्म आणि धम्म यातील मूलभूत फरक विसरल्यामुळे आज पुन्हा समाजाला अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, नवस, व्रतवैकल्ये, देव यांची विषबाधा झालेली दिसते. या विषबाधेवर उपचार करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माचे आचरण, प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. कारण, बाबासाहेबांना धम्माद्वारे एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता. जातिसंस्थेचे उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचे होते. लोकशाहीला धर्मनिरपेक्षतेची जोड देऊन बळकट करायचे होते. पण, हे कितपत साध्य झाले, यावर साऱ्या बहुजनांनी विचार करून कृती करणे आवश्यक आहे.
-एम. व्ही. एम. महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पिंपळनेर.

संबंधित पोस्ट

युवकांनो नोकरी शोधताय, इथे आहे नोकरीची संधी..

divyanirdhar

का केला वाघाने विशेष पथकावरच वाघाचा हल्ला… वाचा

divyanirdhar

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर

divyanirdhar

रिपब्लिकन विचारधारा स्वीकार करे : डा मोहनलाल पाटील

divyanirdhar

सहा महिन्यांपासून रेशनच्या धान्यासाठी वणवण…अधिकारी देतात हुलकावणी

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

divyanirdhar