नागपूर : अध्यक्षांची ही कृती योग्य नाही. सदस्यांच्या त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु, त्यांनी पळ काढला. हे हुकूमशाहीचे लक्षण आहे. याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करू, असा इशारा भाजपचे उपगटनेते व्यंकट कारेमोरे यांनी दिला.
सभा रंगात येत असतानाच अचानक अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. कुणाचेही न ऐकून घेता त्यांनी मनमर्जीपणे असा प्रकार केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे सदस्यांना मुद्देच मांडता आले नाही. तर विरोधकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवीत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाइन झाली. यात बालकांसाठी तालुक्यात कोविड सेंटर तयार करण्यासाठी आवश्यक निधी सेस फंडातून देण्यास मंजुरीसह विविध विषय चर्चेला येणार होते. सर्व प्रथम कोरोनाबाबतच्या विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षा बर्वे कोरोनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या बाल कोविड सेंटरचीही माहिती दिली. परंतु, आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका विरोधी पक्षातील सदस्यांनी केली. बाल कोविड सेंटरला सर्वच सदस्यांनी समर्थन दिले. त्यानंतर सदस्यांनी विविध विषयांवर सत्तापक्षाला धारेवर धरले. सायकल वाटपातील घोळ, सर्कलमध्ये येणाऱ्या अडचणी सदस्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावर अध्यक्ष किंवा प्रशासनाकडून कोणतेही उत्तर आले नाही. ऑनलाइन सभेत येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना योग्यरीत्या मुद्दे मांडता आले नाही. अनेक सदस्य उशिरा संपर्कात आले. ते मुद्दे मांडत असतानाच अचानक अध्यक्षा बर्वे यांनी सभा संपल्याचे जाहीर केले आणि त्या ऑफलाइन झाल्या. हे पाहून अनेकांना धक्का लागला. अध्यक्षा ऑफलाइन झाल्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यच बोलत होते. राष्ट्रवादी सदस्याचे लिंकवर चर्चा करीत आहे.
ऑनलाइनमध्ये अनेक तांत्रिक अडचण येत आहे. आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे सभा तहकूब करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य दिनेश बंग यांनी केली. याला सलील देशमुख, भाजप सदस्य व्यंकट कारेमोरे, आतीष उमरे व इतर सदस्यांनी समर्थन केले. परंतु अध्यक्षा बर्वे यांनी नकार दिला.