दिव्य निर्धार वृत्तसेवा
चंद्रपूर : गावाच्या वेशीवर उभे आयुष्य काढले. समाजाकडून पदोपदी अपमान सहन केला. स्वातंत्र्य, मान, सन्मान हे नशिबी नव्हते. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने बाप माणूस मिळाला. त्यानंतर या मागास समाजात आशेचा किरण निर्माण झाला. आपल्याला चांगले दिवस येतील, अशी आशा मनात घर करून गेली. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घालत या समाजाचे उत्थान केले. संविधानात अनेक तरतुदी केल्या. स्वातंत्र्यानंतर या समाजासाठी अनेक योजना राबविल्या जाऊ लागल्या. समाजात हक्काचे स्थान देण्यात आले. परंतु, आजही अनुसूचित जातीत अंतर्भाव असलेल्या अनेक मागास जातींचे शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) राज्यातील मागासजातीचे बेंचमार्क सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील ४०७ गावांची निवड केली आहे. अनुसूचित जातीच्या विकासासाठी या संशोधनाची मोठी मदत होणार आहे.
राज्यातील अनुसूचित जातीमधील मागासजातीचे बेंच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यामागील कारणे शोधण्यात येणार आहे. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने आराखडा तयार केला आहे. ४०७ गावांत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मागासजातीच्या उत्थानासाठी बेंच मार्क सर्वेक्षण मैलाचा दगड असणार आहे. बाबासाहेब आंबडेकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती, वंचित घटकांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात येते. आतापर्यंत १३ हून अधिक संशोधन अहवाल तयार करण्यात आले आहेत. तसेच शासकीय योजनांचे मूल्यमापनाचे १३ पेक्षा अधिक अहवाल शासनाला सादर करण्यात आले आहेत. राज्यातील अनुसूचित जातीमधील मांग गारुडी, होलार, कैकाडी या जातीचे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी हे बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात येणार
बेंच मार्क सर्वेक्षणाची तीन टप्यांत विभागणी करण्यात आली आहे. ग्रामीण, शहरी क्षेत्रासोबतच व्यवसाय, मजुरी आणि नोकरीचा क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. वंचित जातीमधील मागासाची कारणे शोधण्यासाठी १० अभ्यास क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. या १० अभ्यास क्षेत्रातून माहिती घेऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राजकीय व शासकीय सेवेतील सहभाग सर्वेक्षणाचे सात विभागनिहाय ७ गावांमध्ये पथदर्शी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासर्वेक्षणामुळे मागास जातीच्या विकासाला चालना मिळणार असून अनेक योजनांपासून वंचित असलेल्या घटकाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळणार आहे. बार्टीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे वंचित जातींना न्याय मिळण्याची मार्ग मोकळा होणार आहे.
मागासलेपणाचा घेणार शोध
बेंचमार्क सर्वेक्षणाच्या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली असून, या जातीमधील मागासलेपणाचा शोध घेऊन त्यावर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील ४०७ गावांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील २१ जिल्ह्यातील ६३ तालुक्यांत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याकरिता २८ हजार ६८० कुटुंब आणि १ लाख ४३ हजार ३९८ व्यक्तींसोबत संवाद साधण्यात येणार आहे. तर मुलाखतीसाठी १७ प्रश्नांची अनुसूचित तयार करण्यात आली आहे. औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि कोकण विभागातील समतादूतांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अनुसूचित जातीमधील विकासासाठी बार्टीचा बेंचमार्क सर्वेक्षण मैलाचा दगड ठरणार आहे. आतापर्यंत मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या आणि शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या वंचित जातींमधील मागासाची कारणे शोधण्यात येणार आहे. बार्टीने आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणामध्ये अतिशय आधुनिक पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात असून याकरिता एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. यातून ऑनलाइन माहिती भरण्यात येणार आहे.
– धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी, पुणे