दिव्य निर्धार प्रतिनिधी
नागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने महानगरपालिकेला कोट्यवधींचा निधी दिला. परंतु, मनपाच्या आरोग्य विभागाने सरकारच्या अटी, शर्तींचा भंग करून कोरोना साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. यात मनपाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी असून, या प्रकरणी मनपा आयुक्त मूग गिळून बसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव, नगरसेविका आभा पांडे यांनी आज केला.
प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना आभा पांडे म्हणाल्या, कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मनपाला सीडीआरएफ आणि एनएचएम अंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले. हा निधी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. परंतु, शासन नियम धुडकावून कोरोना उपाययोजनेवर कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली. कोविड साहित्य खरेदीत अनियमितता दिसून येत आहे. 14 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2020 रोजी मनपाचे तत्कालिन आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई हे कोरोना बाधित झाल्याने रजेवर गेले होते. तरीही त्यांच्या खोट्या स्वाक्षर्या करून आरोग्य साहित्याची खरेदी करण्यात आली. याशिवाय एकादिवशी कधी डॉ. संजय चिलकर तर कधी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या वेगवेगळ्या स्वाक्षर्या नस्तीवर घेण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे नस्ती तयार करणारी व्यक्ती एकच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
श्वान दंश लसीची नियमबाह्य खरेदी
राज्य शासनाने कोरोना नियंत्रणासाठी एसडीआरएफ फंड दिला होता. परंतु, हा निधी कोरोनावर खर्च न करता त्यातून मनपाने नियमबाह्य श्वानदंश लसी खरेदी केल्या, असा गंभीर आरोपही पांडे यांनी लावला.
प्रस्ताव अन् कार्यादेशावर तारखेला फाटा
मनपाच्या आरोग्य विभागाने खरेदी प्रस्ताव व कार्यादेशावर तारखेचा उल्लेखच केलेला नाही. कार्यादेशावर जावक क्रमांक टाकणे टाळण्यात आले. तसेच मनपाने 2 हजार व्हिटीएम किट स्मित फार्मास्युटिकल नागपूर यांच्याकडून अधिक दराने खरेदी केल्या. ही रक्कम सीडीआरएफ व एनएचएम अनुदानातून देण्यात आली. पीपीई किट, ऑक्सिमीटर, पल्स मीटर खरेदीचे दर आणि शासनाच्या जेम्स पोर्टलवरील दरात फार तफावत आहे. यावरून या साहित्य खरेदीत फार मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे अधोरेखित होते, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.
15 दिवसांची मुदत
मनपाच्या आरोग्य विभागाने केलेल्या साहित्य खरेदीचे अंकेक्षण करावे, तसेच या घोटाळ्याची येत्या 15 दिवसांत चौकशी करावी. अन्यथा राज्य शासनाकडे आणि न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा आभा पांडे यांनी शेवटी दिला.