प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
रायगड : ‘आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे’, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावले आहे. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून सरकारला इशारा दिला आहे. ६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत मराठा आरक्षणाविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे.
यावेळी येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.’तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितलं आहे. हो आहे मी संयमी. पण आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवल आहे की आंदोलन हे निश्चित आहे’, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे