दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
अर्जुनी मोरगाव : नगर पंचायतीचा पहिले पंचवार्षिक पूर्ण झालेले असून शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास 13 जूनपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेना व युवासेनाने निवेदनातून नप प्रशासनाला दिला आहे.
निवेदनानुसार, अर्जुनी मोर ग्रामपंचायतीचे परिवर्तन नगर पंचायतीमध्ये होऊन पाच वर्ष झालेली आहे. मात्र विकास कामांना वेग आलेला नाही. परिणामी अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. विशेष म्हणजे, शहरातील पाणीपुरवठ्यासाठी अनेक भागात नळ पोहोचले नाही तर अनेक भागात पाईप लाईन फुटलेल्या आहेत. प्रभाग 14, 7, 11, 13, 16 मधील फुटक्या पाईप लाईनमुळे नागरिकांच्या घरापर्यंत पाणीच पोहचत नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी. तसेच पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अद्यापही नगर पंचायतीने नाल्यांच्या स्वच्छतेसाठी कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे पावसाळ्यात साथरोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाल्यांची तातडीने सफाई करण्यात यावी. अन्यथा तालुका शिवसेनेच्या वतीने 13 जून 2021 ला नगर पंचायत समोर आमरण उपोषण करण्याच्या इशारा शिवसेना जिल्हा सचिव संजयसिंह पवार, शहर प्रमुख तथा माजी नगर सेवक प्रकाश उइके, युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम यांनी दिला आहे.