नागपूर ः मनपाच्याच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सुट्टयांचे पैसे काढून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मनपाच्या धरमपेठ झोनचा वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये याला लाच घेताना रंगेहात पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पारडी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचे पती धरमपेठ झोन कार्यालयात आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कामाला होते. ३१ मार्च २०२१ रोजी महिलेचे पती निवृत्त झाले.महिलेचे पती सतत आजारी असल्याने त्यांनी पत्नीला निवृत्ती वेतनासंबंधी माहिती घेण्यासाठी कार्यालयात पाठविले. महिलेने वेतन व पेंशनसंबंधी कामकाज पाहणारा लाचखोर वरिष्ठ लिपिक राजेंद्र गजभिये याची भेट घेतली. निवृत्तीनंतरची पेंशन आणि सुट्यांच्या पैशाबाबत विचारणा केली असता गजभिये याने सुट्यांचे पैसे काढून देण्यासाठी दहा हजार रूपये मागितले. महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक योगीता चाफले यांनी या तक्रारीची गोपनियरित्या चौकशी केली असता गजभिये लाच घेण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मंगळवारी दुपारी धरमपेठ झोन कार्यालयाभोवती सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून दहा हजार रुपयांची लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून गजभियेला अटक केली.