Divya Nirdhar
Breaking News
नागपूरविदर्भ

महानगर पालिकेची पोलखोल; तासभराच्या पावसाने नागपुरात दाणादाण

नागपूर : पहिल्याच पावसाने महानगर पालिकेची पोलखोल झाली आहे. पावसाळापूर्वी नियोजन न केल्याचे दिसून येते. सोमवारी सायंकाळी काही भागांत हलका शिडकावा झाल्यानंतर मंगळवारीही वादळी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. दुपारी एकपर्यंत तापल्यानंतर अचानक आभाळ दाटून आले. पाहतापाहता विजांच्या कडकडटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डी, सिव्हिल लाइन्स, खामला, वर्धा रोड, गोधनी, झिंगाबाई टाकळीसह शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये दणक्यात वादळी पाऊस बरसला.

मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला मंगळवारी वादळी पावसाने जोरदार दणका दिला. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने आलेल्या वादळामुळे अनेक झोपड्या व घरांवरील छप्पर व टिनाची पत्रे उडून गेली. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक चौकांमध्येही वाहतुकीची कोंडी झाली.

जोरदार वादळामुळे अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाने तुटली. रामदासपेठेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील शेडच्या टिना कागदाप्रमाणे उडाल्या. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. तासभर वादळासह आलेल्या पावसामुळे शहराच्या अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अनेक वस्त्या अंधारात दिसून आल्या. रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर झाड पडल्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली. सुभाषनगर ते माटे चौक रस्त्यावर झाड पडले. या ठिकाणीही वाहनांच्या रांगा लागल्या. याशिवाय त्रिमूर्तीनगर नासुप्र उद्यान, रामनगर बौद्ध विहार, शंकरनगरातील जुने वोक्हार्ट हॉस्पिटल, अंबाझरी येथील घाटे रेस्टॉंरट, जुना फुटाळा येथील भिवसेनमंदिर, गोपालनगर, दाभा वायूसेनानगर, बजाजनगर, सोमलवाडा हायस्कूल खामला रोड, जयताळा रोडवरही झाडे उन्मळून पडले. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी झाडे हटविली, परंतु चारचाकी वाहनांतील नागरिकांना बराच वेळ वाहनांतच थांबावे लागले.

व्हेरायटी चौक, जगनाडे चौक, मेडिकल चौक, अशोक चौक, सिद्धेश्वर हॉलसमोरील मानेवाडा रोड, अयोध्यानगर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता, आशीर्वादनगर, रेशीमबाग मैदानसमोरील रस्त्यासह शहरातील अनेक भागातील लहान मोठया रस्त्यांवर पाणी साचले. वाहनधारकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली.

गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे नागपूरकर चांगलेच घामाघूम झाले आहेत. चढलेला पारा व असह्य उकाड्यामुळे चिडचिडेपणा वाढला आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागपूरकरांना दिलासा मिळाला. शिवाय पाऱ्यातही मोठी घसरण झाली.

हवामान विभागाने येत्या १२ जूनपर्यंत नागपूरसह संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. १० जूनला मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात येत्या ११ जूनला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, तो आंध्रप्रदेशमार्गे विदर्भाच्या दिशेने सरकणार आहे. यामुळे विदर्भात १२ ते १४ जूनदरम्यान मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

बायको गेली माहेरी, अन् नवऱ्याचे जुळले शेजारणीची सूत… काही दिवसांत झाले हे.. वाचा

divyanirdhar

1600 कोटी खर्च येणार, 10 एकरात सेंटर; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या दौऱ्याने कॉंग्रेसमध्ये उत्साह

divyanirdhar

सहा महिन्यांपासून रेशनच्या धान्यासाठी वणवण…अधिकारी देतात हुलकावणी

divyanirdhar

राष्ट्रवादीचा शहराचा नवा गडी तयार, शहराध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची नियुक्ती

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या घरासाठी रमाई घरकुल योजनेचे लक्ष्यांक वाढवा; राहुल घरडे यांची मागणी

divyanirdhar