नागपूर ः सध्या जिल्हा परिषदेच्या कारभारात हुकुमाशाही आल्याचा आरोप विरोधक करतात. हे आता खरे असल्याचे दिसून येते. सायकल वाटपामध्ये शिक्षण सभापतीची अरेरावी अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. आपल्याच सर्कलमध्ये अधिकच्या सायकली घेतल्या. विरोधकांनी आक्षेप घेतला तर त्या म्हणतात, अधिकच्या सायकली घेतल्या तर काय बिघडले?. त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे सहकार्य करीत असल्याचे दिसून येते. यात अध्यक्षही गोत्यात येण्याची शक्यता आहे.
सर्व सदस्यांच्या सर्कलला समान सायकल द्यावे, असा साधारण समज असताना शिक्षण सभापती भारती पाटील यांनी त्यांच्या सर्कलमध्ये ९० टक्के सायकल घेत इतरांवर अन्याय केल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजला. यावर अध्यक्षा रश्मी बर्वे यांना मौन ठेवले. तर सभापतीने आपल्या मतदार संघात जास्त सायकल घेतल्या तर काय झाल? असा उलट सवाल करीत भारती पाटील यांनी इतरांवर अन्याय होणारच असल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले. त्यांच्या भूमिकेने सत्तापक्षातील काही सदस्य नाराज असल्याचे समजते.
शिक्षण विभागामार्फत सेस फंडातून २०२०-२१ मध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप करण्यात येते. त्या अंतर्गत नागपूर पंचायत समितीमधील ९७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ४८ विद्यार्थिनी व ४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेचे सहा सर्कल येतात. सेस फंडाच्या योजनेसाठी सहाही सर्कलच्या सदस्यांनी लाभा करता नावांचे प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठविले होते. परंतु सभापतींनी निवड करताना इतर सदस्यांच्या सर्कलमधील नावे कमी करून आपल्या भागातील नावांचा समावेश केला. भाजप सदस्य सुभाष गुजरकर यांनी यावर आक्षेप घेतला होता. जिल्हा परिषदेच्या सभेतही हा विषय गाजला. विरोधी पक्षातील काही सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला. याला सत्तापक्षातील काही सदस्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा आहे. सभेनंतर भारती पाटील म्हणाल्या की, मी सभापती आहे. सभापतींनी जास्त सायकल घेतल्या तर काय झाल. सायकल वाटपाबाबत कोणतेही निकष नाही. समितीत नावाच्या याद्या अंतिम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सायकलींचा लाभ शिक्षण
समितीच्या मोजक्याच सदस्यांना
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून २० लाखांच्या २३८ सायकलीसाठी विद्यार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली होती. नागपूर पंचायत समिती अंतर्गत मंजूर झालेल्या ९७ सायकली पैकी ८९ सायकल शिक्षण सभापती यांनी आपल्या सर्कलमध्ये घेतल्याचे समोर आले. त्यामुळे गुजरकर यांनी सभापतींना टार्गेट करून ताशेरे ओढले. दरम्यान एक-एक करता तेराही तालुक्यात मंजूर झालेल्या सायकलची यादी समोर आली. त्यात जिल्हा परिषद अध्यक्षाच्यांही सर्कलमध्ये तालुक्यातून सर्वांत जास्त सायकल वाटप झाल्या. शिक्षण समितीतील कॉंग्रेसच्या तीन सदस्यांच्या सर्कलमध्येसुद्धा जास्त सायकली पळवून नेण्यात आल्या. काही विशिष्ट सदस्यांना सायकल मंजुरीत जास्त वाटा देण्यात आला. यात काँग्रेसचे जे अबोल सदस्य आहे त्यांनाही डावलण्यात आले.
शिक्षण विभागाच्या सायकलींचा सभापती भारती पाटील यांनी सर्वाधिक लाभ घेतल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला. सायकलींचा लाभ त्यांच्यासोबत इतर काही मोजक्याच सदस्यांना झाला. कॉंग्रेसच्याही अनेक सदस्यांच्या सर्कलमधील लाभार्थ्यांना सायकल मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. तर या प्रकरणी चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे.
शिक्षण समितीच्या माध्यमातून झालेल्या सायकल वाटपात भेदभाव झाला. सदस्यांना विश्वासात न घेता साहित्याचे वाटप झाले. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सीईओंकडे केली आहे.
व्यंकट कारेमोरे, उपगटनेते, भाजप