
दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत बांधकाम मजुरांची ऑनलाइन नोंद केल्या जाते. या योजनेत शेकडो बोगस मजुरांची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. जिल्ह्यातील काही ऑनलाइन सेंटरवर असे प्रकार करण्यात येत असून याप्रकरणी काही सेंटरवर गुन्हे दाखल करण्यात आले.
बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरिता मंडळाकडून दर तीन वर्षांतून एकदा पाच हजारांपर्यंत अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र बांधकाम कामगाराने मंडळाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र, या योजनेचा काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. नागपूर जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. नागपूर अपर कामगार आयुक्त कार्यालयाकडून याकरिता वेगवेगळे दक्षता पथक तयार करण्यात आले. या पथकाने हा गोरखधंदा उजेडात आणला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात हे प्रकार सुरू आहेत. या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची तक्रारी आहेत.
ग्रामपंचायतींच्या लेटरहेडचा वापर
कळमेश्वर आणि हिंगणा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या लेटरहेडचा वापर करून अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी काही लोकांनी या योजनेचे अर्ज भरून देण्याची दुकानेच मांडली आहे. योजनेत पैसे व अवजारे मिळत असल्याने नागरिकांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात आहे. एका अर्ज भरण्याचे ३०० ते ५०० रुपये घेतले जात असल्याचे चित्र आहे.
दक्षता पथकाच्या छाप्यात आढळले बोगस शिक्के
नागपूर येथे दक्षता पथकाने घातलेल्या छाप्यात कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव(सा.) ग्रामपंचायतीने निर्गमित केलेले ९० दिवसांचे काम केल्याचे ४६ प्रमाणपत्र आढळून आले. तसेच हिंगणा तालुक्यातील वडगाव (गुजर) ग्रामपंचायतीने निर्गमित केलेले ३ प्रमाणपत्र आढळले. तर ग्रामपंचायतीची माहिती भरलेले व कामगाराची माहिती नसलेले दोन कोरे अर्ज आढळले. ५१ अर्ज छाप्यात सापडले. ९० दिवसांच्या प्रमाणपत्रांमध्ये सहीची तफावत आढळली. यामुळे ते अर्ज जप्त करण्यात आले. संबंधित ग्रामपंचायतींना यासंदर्भात माहिती देऊन विचारणा केली असता त्यांनी वरील प्रमाणपत्र दिलेच नसल्याचे सांगितले. तर अर्ज भरून देणाऱ्या नागपूर येथील अजयकुमार नाखले याच्याविरुद्ध फसवणूक, बनावटीकरण, बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे, या प्रकारचा आरोप असून त्याविरुद्ध दक्षता पथकातील अधिकारी रीना अनंता पोराटे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गोंडे करीत आहेत.
बांधकाम मजुरांना योजनेचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांची नोंद असल्याचे उजेडात आल्याने दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली. ही पथके दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन छापा मारीत आहेत. अनेक ऑनलाइन सेंटर छापे टाकण्यात येत आहेत. यापुढे कोणाचीही गय गेली जाणार नाही. खऱ्या मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
किशोर दहीफळकर, अपर कामगार आयुक्त, नागपूर विभाग

